पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


प्रतिपक्षांतील मोठ्या माणसांची मनसोक्त निंदा करणें, प्रतिपक्षाबद्दल अत्यंत अनुदार उद्गार काढणें, प्रतिपक्षाला चारीमुंडे चीत करणें, या गोष्टी मत्सर व शत्रुत्व वाढविणाऱ्या आहेत. या शत्रुत्वाचा फायदा घेणारी शक्ति प्रवळ असल्यामुळे पूर्वी झालेल्या चुका न होण्याबद्दल भावी पिढीने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. सद्गुण संवर्धन हें उदयोन्मुख राष्ट्राला आवश्यक आहे. राष्ट्र सगुणानेच वर येतात; वावदूकपणाने येत नाहींत, परंतु पश्चाभिनिवेशाच्या होम- कुंडांत ही सद्गुणांची आहुति दिली जात आहे, हा सर्वस्वी राष्ट्रघात नव्हे काय ? आम्हीच तेवढे शहाणे, आमचाच पक्ष खरा, असें जें हट्टाचें राजकारण हल्लीं चालले आहे, त्या हट्टांत एकमे काचा शेवट होणार अशी भीति वाटते, होतकरू राजकीय मुद्रा- यांनी या धोक्याच्या सूचना लक्षांत घ्याव्या.
 राजकीय पुढाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन जे तरुण कोणत्याहि कार्यात पडूं इच्छितात, त्यांनी आधी स्वतःला काय करितां येईल याचा नीट विचार करून कोणत्याहि कार्यात पडावे. पुष्कळ तरु- णांच्या पुढाऱ्याबद्दलच्या भलत्याच अपेक्षा असतात. त्यामुळे केव्हां केव्हां पुढाऱ्यांच्या नांवाने बोटे मोडण्याचा त्यांच्यावर प्रसंग येतो. पण त्यांत पुढाऱ्यापेक्षां तरुणांचाच अविचार जास्त आहे, असें ह्मणावें लागेल. कार्याची दिशा दाखविणें, योग्य सल्लामसलत देणें, उत्तेज- नाचे चार शब्द उच्चारणं याशिवाय पुढारी तरी तरुणांना कोणती मदत करतील? प्रत्येकाला काम देणें किंवा आर्थिक मदत करणे, हैं काम एक खानदानीचा संपन्न पुढारी किंवा राजाच करूं शकेल देशबंधु दासांसारखे तरुणांची काळजी घेणारे व योगक्षेम चालवि- णारे पुढारी मिळणें हें महद्भाग्य समजलें पाहिजे. पण दरिद्री देशांत असे पुढारी कसें सांपडणार ? दरिद्री महाराष्ट्राला राजकारणाशिवाय गत्यंतर नाहीं, हाणून मध्यम स्थितींतले सुसंस्कृत लोक राजकारणांत पडत आहेत. राजकारणावर जगण्याचा ज्यांचा धंदा आहे, अशा पुढाऱ्यांकडून भलती अपेक्षा करणें ह्मणजे शिवरात्रीने एकादशीच्या