पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
देशकार्येच्छु तरुणांस कांहीं सूचना.

१३३


आणि हिंदुस्थानांतील विविध राजकीय पक्षांच्या कामगिऱ्यांचाहि नीट अभ्यास करावा. सूक्ष्म अभ्यास, परिस्थितीचें समालोचन, आणि विविध पक्षांचे मतभेद, हें लक्षांत घेऊन राजकारणांत पड़ लेली माणसे फार थोडी आढळतील. कांहींना अनिच्छेनें राजकार- णांत पडावें लागलें, तर कांहींना सरकारच्या क्षोभामुळे राजकारणांत पडणें भाग पडलें. सरकारच्या पाशवी जुलमामुळे कोणाला राज- कारण हातीं घ्यावेसे वाटले, तर कांहींना दुसरा उद्योग नसल्यामुळे राजकारणाचा धंदा करावा लागला, अशी वस्तुस्थिति आहे. स्वतंत्र अभ्यास करून, स्वतंत्र मत बनवून, स्वतंत्र ध्येयाने राजकारणांत पडणारे पुढारी यापुढें उत्पन्न झाले पाहिजेत. कांहीं व्यक्तीवर निष्ठा, कांहीं व्यक्तींचा पूर्ण परिचय, कांहीं व्यक्तींचा स्नेह, एवढ्यावर एकाद्या पक्षाच्या अभिनिवेशानें जे तरुण राजकारणांत पडतील, ते प्रतिपक्षाला शिव्या देण्याचेंच कार्य चांगले करतील. राजकीय पक्षांची रचना चक्रव्यूहासारखी आहे. पक्षोत्पादक विभूति, तिच्या खालचे एकदोन पुढारी, त्यांची प्रभावळ, त्यांचे कांहीं गुंड, बगलबच्चे व भोवतालचे बाजारबुणगे अशा व्यूहांत एखादा तरुण सांपडला की मागचे भांडण पुढे चालविण्याशिवाय त्याच्या हातून कोणतेही कार्य होणार नाहीं. राजकीय चक्रव्यूहांतील पुढायला भोवतालच्या लोकांच्या आहारी पडून वेळोवेळी तोंडघशी पडावे लागते, अशींहि उदाहरणे पुष्कळ सांपडतात. भावी तरुण पुढाऱ्यांनी पूर्वीच्या चुका, पूर्वीची भांडणें, व पूर्वीचा मत्सर यांची परंपरा चालविण्याचें बंद पाडले, तरच राजकीय क्षेत्रांत उन्नतीची आशा आहे.
 मत्सर हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. मत्सर हा महाराष्ट्राचा राष्ट्रिय दुर्गुण आहे; अशी साक्ष इतिहास देत आहे. या दुर्गुणाचा नायनाट राजकीय पक्षांनी केला पाहिजे. आपल्या पक्षांतील मनुष्य देशभक्त व दुसऱ्या पक्षांतील देशद्रोही असें समजणे चूक नाहीं काय ? देशभक्ति व देशद्रोह यांमध्ये तिसरी अवस्थाच नाहीं काय ?