पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
देशकार्येच्छु तरुणांस कांहीं सूचना.

१२९


विचारांचे शुद्धीकरण करून राष्ट्राला बिनचुक मार्ग दाखवितात. अशा कर्त्या पुरुषांची परंपरा ज्या राष्ट्रांत अखंड चालते, त्यालाच जिवंत राष्ट्र असें ह्मणतात. कर्ते पुरुष हेंच राष्ट्राचे धन होय. कर्त्या पुरुषांची परंपरा चालविणें, हें तरुणांचें मुख्य कर्तव्य आहे.
 कोणतेही कार्य भावनेनें होतें, भावनेचा प्रबळपणा हा महत्कार्याला कारणीभूत होतो. तारुण्यांत भावना ही विशेष जोरांत असल्यामुळे गेल्या वीस वर्षांच्या विविध चळवळींत विद्यार्थ्यांनी बरीच कामगिरी केली आहे, असे निदर्शनास येईल. एखादी चळवळ सुरू झाली कीं पुढारी आधीं तरुणांनाच आव्हान करतात. प्रसंगी कार्याला महत्त्व यावें व चळवळीला थोडा रंग चढावा ह्मणून दिशाभूलहि होते. विद्यार्थीहि तारुण्यांतील स्वभावानुरूप हुल्लडीनें कांहीं कामें करून दाखवितात. अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करून राष्ट्राच्या हांकेला " ओ " देऊन जे तरुण आज कार्य करीत आहेत, किंवा स्वार्थ बाजूस ठेवून प्रसंगी झीज सोसून जे लोक आज राष्ट्रकार्य करीत आहेत, तेवढ्याने राष्ट्रकार्याचा गाडा पुढे जाणार नाहीं. यापुढें राष्ट्रकार्यांला वाहिलेले पण समर्थ असे तरुण पाहिजे आहेत. प्रसंग तुरुंग, किंवा प्रसंगीं झीज सोसणाऱ्या माणसांपेक्षां आमरण कष्ट करणारे, दारिद्याची शपथ घेणारे, समर्थ तरुण राष्ट्रांत निपजले पाहिजेत. प्रतिभासंपन्न, विद्वार, दूरदर्शी, धारणावान्, आणि दमदार पुढारी निपजल्याशिवाय हें स्वातंत्र्याचें युद्ध निभावणार नाहीं.
 हुक्कीरसे भरी भरणारे, हुल्लडीबरोबर हुरळून जाणारे, स्वतः पूर्ण विचार न करितां दुसऱ्यावर फाजील विश्वास टाकून वागणारे, वर्तमानपत्रांत नांव दिसले कीं कृतकृत्यता मानणारे तरुण आज जें थोडेबहुत दिखाऊ काम करीत आहेत; तें फारसं टिकाऊ नाहीं. ज्यांना कांहीं मोठें कार्य करावेसे वाटतें त्यांनी देशकार्य करण्याची घाई करूं नये. कच्चेपणा हा कोणत्याहि कार्याचा नाशच करितो अकाली जबाबदारी व अकाली मोठेपणा या गोष्टी कार्यनाशाच्याच असतात. देशांत बुद्धिमान् लोक थोडे, त्यांतील बरेचसे सरकारच्या
१७