पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


प्रकरण पंधरावें
देशकार्येच्छु तरुणांस कांहीं सूचना

 पुष्कळ तरुणांमध्ये हल्ली देशकार्य करण्याची प्रवृत्ति दिसत आहे. राष्ट्रांतील तरुणांचे लक्ष्य राष्ट्रकार्याकडे लागणें हें सुचिन्ह आहे. स्वार्थाचा विचार बाजूस ठेऊन राष्ट्रहिताचा विचार देशांत होऊं लागला की राष्ट्राची उन्नति होते. हिंदुस्थानांतील लोकांना विशेषतः तरुणांना स्वराज्यसूर्याचा उदय लवकर होणार असें वाटत आहे. तरुणांची उत्सुकता आशा व हिंमत हीं कायम ठेविली पाहिजेत; नाहींतर त्यांची मने निराशा व निरुत्साह यांच्या वादळांत सांपडतील. तरुणांनी आमरण राष्ट्रकार्य करावें आणि त्यांच्या हातून राष्ट्राची भरीव कामगिरी व्हावी, या उद्देशाने होतकरू तरुणांना कांहीं सूचना या प्रकरणांत करावयाच्या आहेत.
 कर्झनशाहीत बंगालचे तुकडे केल्यामुळे हिंदुस्थान देश जागृत झाला. स्वातंत्र्यावांचून गत्यंतर नाहीं, अशो राष्ट्राची खात्री पटली. स्वातंत्र्याकरितां झगडणारे खंदे वीर तरुणपिढींतून उत्पन्न व्हावेत, झणून विविध संस्था व कार्ये सुरू झाली. लोकजागृती करितां चळवळी निघाल्या. उत्तरोत्तर कार्याचा व्याप वाढत आहे. धर्म समाज, शिक्षण, राजकारण, शेती, उद्योगधंदे, कलाकौशल्य इत्यादि शाखांत उन्नतीला अनुकूल अशी सुधारणा करण्याची खटपट चालू आहे. अपूर्व शोध, अपूर्व करामत करणारे आणि हिंदुस्थानाचा लौकिक वाढविणारे पुरुषाहि निर्माण व्हावेत, असे पुष्कळांना वाटत आहे.
 राष्ट्राची योग्यता राष्ट्रांतील माणसांवरून ठरते. राष्ट्रांतील मोठी माणसे राष्ट्राला मोठें करीत असतात. कवि, मुत्सद्दी, ग्रंथकार, शास्त्रज्ञ आणि शोधक हेच राष्ट्राच्या शिरोभागी असतात. हेच पुरुष राष्ट्राला वळण लावतात आणि लोकांच्या भावनांचे