पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तेरावे. ]
स्वदेश.

११९


केला, ज्या पवित्र भूमीत नल, राम, युधिष्ठिरासारखे पुण्यश्लोक, न्यायी, प्रजारंजनानुवर्ती चक्रवर्ती होऊन गेले, सीता, सावित्री, दमयंती, द्रौपदी, यांच्यासारख्या जगत् पूजनीय पतिव्रतांनी ज्या भूमीत जन्म घेतले, जेथें जनकासारखे राजयोगी आणि शुकासारखे त्यागी होऊन गेले, जेथे कर्ण, अर्जुन, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, प्रतापसिंह शिवाजी, तानाजी, असे रणगाजी होऊन गेले, ज्या धर्मभूमीत श्रीशंकराचार्य, कुमारिलभट्ट, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, भगवान् बुद्ध, जिनेश्वर, बसवेश्वर, कबीर, चैतन्य, नानक, गुरुगोविंद यांच्यासारखे तत्त्वज्ञानांचे आणि धर्मपंथांचे प्रवर्तक होऊन गेले, ज्याठिकाणीं ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, भास्कराचार्य अशीं विद्वद्वत्नें उत्पन्न झाली, कालिदास, भवभूति यांच्यासारख्या कवींना जेथे काव्ये स्फुरली, ज्या भूमीत आजपर्यंत हजारों साधु, संत, सत्पुरुष, महात्मे, मुत्सद्दी, कर्ते, वीर, कवि, शोधक, कल्पक, होऊन गेले त्या भरतभूमीची, त्या आर्यमातेची थोरवी वर्णन करण्याला कोणता पामर समर्थ आहे ?

 ही भरतभूमि निसर्गवैभवानेंहि परिपूर्ण आहे. जेथें प्रसन्न पुण्य- सलिला भगवति भागीरथी, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी- सारख्या सरित्प्रवरा पापताप फेडण्याचें व दैन्य घालविण्याचे काम अहोरात्र करीत आहेत, ज्या पवित्र भूमीला नगाधिराज हिमाचलानें एका बाजूला अवर्णनीय शोभा आणिली आहे, सह्य, विंध्य अशा पर्वतश्रेष्ठांनी जिला तटबंदी केली आहे, ज्या समृद्धभूमीत सर्व तऱ्हेच्या औषधिवनस्पतींची आणि खनिज पदार्थांची रेलचेल आहे, जेथील जमीन सर्व प्रकारची धान्यें विपुल उत्पन्न करण्यास समर्थ आहे, जेथील हवा कोठें शीत, कोठें उष्ण व कोठें समशीतोष्ण अशी आहे, जेथें अनेक प्रकारचे पक्षी अंतराळांत यथेच्छ आहारविहार करत आहेत, जेथे वन्य आणि ग्राम्य पशुहि पुष्कळ आहेत, जिला अमरवन, नंदनवन, जगदुद्यान, अशीं नांवें मिळाली आहेत, त्या मातृभूमीवर त्या पुण्यभूमीवर प्रेम करा व तिची सेवा करा असें हिंदुस्थानांतील