पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


या सर्व गोष्टी आह्मीं संपादिल्या पाहिजेत. नवीन जगांत, नवीन युगांत, उत्पन्न झालेल्या नवीन साधनांच्या साह्यानें हिंदुस्थानाला जगावयाचे आहे, यांत तिळप्राय संशय नाहीं. इंग्रजांच्या सहवासा- पासून जे फायदे तोटे झाले त्यांचा विचार करून प्रत्येकाने आपल्या हातून घडेल तेवढी स्वदेशसेवा करण्याचा यत्न केला पाहिजे.

 मनुष्यावर अनेक प्रकारची ऋणे असतात. देवऋण, पितृऋण आणि ऋषिऋणाप्रमाणें मातृभूमीचेही ऋण मनुष्यावर असतें. त्या ऋणांतून मुक्त होण्याला स्वदेशसेवा हा एकच मार्ग आहे. माझा देश, माझें राष्ट्र, यांचा लौकिक मी पहाणार, माझ्या देशाची संपत्ति मी वाढविणार, माझ्या मायदेशाच्या उन्नतीआड जे जे कांहीं येईल तें तें मी नाहीसे करणार, असे पौरुषाचे उद्गार हिंदु- स्थानांतील प्रत्येक तरुणाच्या तोंडून अभिमानानें निघाले पाहिजेत. तसे उद्गार निघण्याला हिंदुस्थान देशाजवळ अभिमानाने सांगतां येईल, अशी साधनसामुग्रीही आहे.

 जगांतील इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानदेशाचेंहि निसर्गवैभव, प्राचीन परंपरा, इतिहास व संस्कृति, हीं इतर देशांपेक्षां कोणत्याहि दृष्टीनें कमी नाहींत. ज्या ज्या कारणांनी मातृभूमीवर प्रेम करण्याची प्रवृत्ति होते, तीं तीं सर्व कारणे आपल्या मातृभूमीच्या ठायी आहेत. जी भरतभूमि साक्षात् ईश्वराचें निवासस्थान आहे, जेथे प्रत्यक्ष भगवंतांनीं भक्तजनसंतारणार्थ व दुष्टनाशार्थं अनेक अवतार धारण केले, ज्या पवित्र भूमींत जगांतील अत्यंत प्राचीन वाङ्मय (वेद) ज्याला ईशनिःश्वसित ह्मणतात, ते मंत्रदृष्टया ऋषींना ईश्वरापासून प्राप्त झाले, ज्या भूमीत भगवान् पाणिनि, पतञ्जलि, कणाद, गौतम, कपिल, जैमिनि आणि बादरायण अशा प्रतिभावान् शास्त्रकारांनी शास्त्रे निर्माण केली, जेथें व्यासांची भारती भारताला प्रसवती झाली, जेथे आदिकवि वाल्मीकींना रामायण रचण्याची स्फूर्ति झाली, ज्या भरतभूमीवर वसिष्ठ विश्वामित्रादि दैदीप्यमान् तपोभास्कर तळपले, जेथें धर्मशास्त्रप्रयोजकांनीं चातुर्वर्ण्य संस्थेचा अनेकवार जयजयकार