पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०

विणक-याचा मार्गदर्शक.


 सांदीच्या काठ्यांच्या पलीकडे दोरा तुटला तर सांधलेलें दुसरें टोंक तुटलेल्या दो-याच्या शेजारील दो-यास चिकटविण्यापूर्वी तो सांधलेला दोरा सांदीच्या काठ्यांवर जागच्या जागीं ओवून घातला पाहिजे व त्याच्या (सम व विषम नंबराप्रमाणें) ठरलेल्या वईच्या डोळ्यांतून काढून घेतला पाहिजे. असें न केलें तर कापड चांगलें विणलें जाणार नाही; कारण अयोग्य रीतीनें काढून घेतलेला सांधदोरा शेजारील दो-याची शिस्त बिघडवून गुंतागुंत करतो व सर्व ताणा बिघडवितो. यामुळे पैशाचें व वेळेचें नुकसान होतें ह्मणून हे काम काळजीपूर्वक केलें पाहिजे.
 शटलमधील बॉबिन संपली म्हणजे दुसरी बॅबिन घालावी व शेवटच्या आडव्या दो-याशी नवा दोरा सांधून घ्यावा. पहिला दोरा कापडाचे मध्येंच संपला असेल तर त्याच ठिकाणी ताण्यातून शटल घालावें. असें करतांना अढी मात्र पडू देऊं नये.

 कापड विणीत असतांना त्याकडे नजर ठेवावी. शटल अडकून कापडांत करळी पडली तर माग थांबवावा ,व त्या ठिकाणचे दोरे लहान कंगव्यानें साफ करावे, व शटल अडकण्याचें कारण दूर करून नंतर माग चालू करावा. चूक होऊन काम आडूं लागलें तर चूक काय कारणानें होत आहे हें पूर्ण लक्षांत आणल्याशिवाय दुरुस्तीची घाई करूं नये; कारण, चूक भलतीकडेच राहते आणि चांगलें काम करणारा मागच कित्येक उतावळे लोक बिघडवून ठेवितात.