पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६
विणकऱ्याचा मार्गदर्शक.

नाहीं हें पहावें. शटलबॉक्सचें तोंड निमुळतें होतां कामा नये, व पेटीचे आंतील बाजूस खडबडीतपणा असू नये म्हणजे शटल पेटीमध्यें येतांना व जातांना अडणार नाहीं. प्रत्येक वेळीं पिकरनें शटलला नेमक्या जागेवर टोला दिला पाहिजे, टोल्याची जागा बदलत गेल्यास शटलच्या गतींत फरक पडत जातो, व पिकर वांकडें होत जातें ह्मणून या गोष्टीबद्दल काळजी घेतली पाहिजे.

 शटल न फिरण्याचें केरकचरा हेंही एक कारण आहे. शटल फिरण्याची जागा (शटल रेस) व पेट्या नेहमीं स्वच्छ ठेवाव्या. पिकर फिरण्याची सळईस व पेट्यांच्या आंतील बाजूंस तेल लावावें. शटलरेस लेव्हलमध्यें असली पाहिजे व ले वांकडा न होतां एक सारखा मागेपुढे हलला पाहिजे.

 माग तपासून पाहिल्यानंतर यार्नबीम त्याकरितां केलेल्या जागीं बसवावा. वया दोरींत अडकवाव्या व फणी ले मध्यें बसवावी. फणी शटलरेसशीं बरोबर काटकोनांत बसली पाहिजे नाहीतर शटल उडेल. वयांचे डोळे फणीच्या उंचीच्या मध्यभागासमोर आले पाहिजेत व ते ले पासून समांतर असले पाहिजेत. नंतर वया पावड्यांस जोडाव्या व फणींतून काढलेले दोरे एकत्र करून ते क्लॉथ रोलरवर असलेल्या लेव्हलपट्टीवरून नेऊन क्लॉथरोलरला अडकवावे. यार्नबीमच्या दोन्ही बाजूस दोन वजनें बांधावीं. या वजनांचा उपयोग ताण्याचे दोरे ताठ राखण्याकडे असतो. शटल मध्यें बॅबिन बसवावी व थोडा दोरा उलगडून त्याचें टोंक