पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



वीणक-याचा मार्गदर्शक.


असलीं विषारी द्रव्यें घालावींं लागत नाहींंत, कारण कापड वेताचेच तयार होत असल्यामुळे तें सांठवून ठेवण्याचा प्रसंगच येत नाहीं.
 (२) गिरणींत सूत खळींत बुडवून तें लागलेंच वाफेनें वाळवितात; यामुळे सुतावरील बारीक बारीक तंतू सुताला पूर्णपणें चिकटत नाहींत व ते असल्या घाईच्या क्रियेमुळे विणतांना गळून जातात. हातमागांत खळ लावण्याचें काम फार सावकाश केलें जातें. त्यामुळे सर्वे तंतू सुतास चांगले चिकटून सूत जास्त मजबूत होतें.
 (३) गिरणीतील कापड वजनावर विकलें जाते; म्हणून वजन वाढविण्याकरितां खळीमध्यें निरनिराळे क्षार घालावे लागतात व वर सांगितल्याप्रमाणें तें सूत खळींतून फार लवकर निघून जात असल्यामुळे ती खळ सुतास चांगली न भिनतां वर वरच लागून राहते. असें झालें म्हणजे खळ देण्याचा, सूत मजबूत करणे हा जो मुख्य हेतू तो साध्य न होतां सुताचें वजन मात्र वाढतें. याचें प्रत्यक्ष प्रमाण असें कीं, कोणत्याही नंबराच्या सुताचा एक गिरणतील धोतरजोडा व त्याच नंबराचा हातमागावरील धोतरजोडा धुवुन पाहिल्यास हातमागाच्या धोतरजोड्याचेंच वजन जास्त भरेल यावरून सिद्ध होतें कीं, गिरणीतील कापडापेक्षां हात मागावरचे कापडांत एकाच नंबराचें सूत असतांही जास्त तंतू राहतात अर्थात हात मागावरचेंच कापड जास्त कसदार व मजबूत ठरतें.
 (४) गिरणीतील मागाची वीण ठासण्याची फणी व इतर तीक्ष्ण भाग अतिशय वेगानें चालत असल्यामुळे सुताचे बरेच तंतू झडून वीणही चांगली ठासली जात नाही; तसें हात मागावर होत नाहींं.