पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

मानसन्मान करतो. शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा धान्यासाठी उत्तम खत शोधून काढून एक खंडीच्या जागी दोन खंडी पिकवून देणाऱ्या संशोधकापेक्षा एका ताऱ्यावरचा प्रकाश किरण दुसऱ्या ताऱ्यावर जात असताना एक दश कोट्यांश सेंटी मीटर वाकडा होतो की नाही हे सांगणारे आइन्स्टाइन् किंवा रामन् यांनाच लोक श्रेष्ठ समजतात. नूरजहानला श्रेष्ठ म्हणताना जे माप असते ते झाशीच्या लक्ष्मीबाईला श्रेष्ठ म्हणताना नसते. सीतेला ज्या कारणासाठी आपण मान देतो त्याच कारणासाठी जिजाबाईला मानतो असे नाही. स्वार्थत्यागावर श्रेष्ठता ठरते असे म्हणावे तर रणांगणात आत्मबलिदान करणाऱ्या कोणच्याही सैनिकापेक्षा शिवाजीला आपण श्रेष्ठ समजतो. पित्राज्ञा पालन करणारा रामचंद्र व तिचा भंग करणारा प्रल्हाद, मातेची पूजा करणारा पुंडलीक व तिची हत्या करू पाहाणारा भरत, सत्यासाठी राज्य घालविणारा हरिश्चंद्र व पावलोपावली त्याला हरताळ फासणारा व फासा म्हणून भर देणारा श्रीकृष्ण या सगळ्यांना आपण श्रेष्ठच समजतो. हे सर्व लक्षांत घेतले म्हणजे अमुक श्रेष्ठ व अमुक कनिष्ठ हे जरी चटकन् आपल्या मनात येत असले तरी त्यां श्रेष्ठकनिष्ठतेची कारणमीमांसा करणे हे अत्यंत अवघड काम आहे हे ध्यानात येईल.
 संस्कृती व प्रगती यांच्या अर्थाबद्दल व अर्थ ठरल्यानंतर त्यांच्या इष्टानिष्टतेबद्दल पंडितांमध्ये जी रणे माजून राहिली आहेत त्यांच्या बुडाशी श्रेष्ठकनिष्ठतेसंबंधी वर सांगितलेली अनिश्चितता हीच आहे. कोणाला संस्कृत समजावे व कोणाला प्रगतिमान समजावे व तसे समजल्यानंतर ते मोठेपणाचे लक्षण समजावे की अधःपाताचे याही बाबतीत पंडितांचे एकमत नाही. एडवर्ड कार्पेंटरच्या मते संस्कृती हा समाजाचा एक मोठा रोग आहे व तो नाहीसा होईल तो सुदिन. संस्कृती म्हणजे काय हे मला समजत नाही असे हॅवलॉक् एलिस याने म्हटले आहे. प्रोग्रेस (प्रगती) हा एक भ्रम आहे पण तो आवश्यक भ्रम आहे असे एकाचे मत आहे. यूरोपमधून येणाऱ्या लोकांखेरीज आफ्रिकेत रानटी लोकच नाहीत असे ब्रिक म्हणतो. आपल्या ज्ञानात वाढ झाली असली तरी शक्ति किंवा बुद्धी या दृष्टीने गेल्या चाळीस हजार वर्षांत मानवाची अणु इतकीसुद्धा प्रगती झाली नाही असे ऑसबॉर्न इतर अनेक पंडित यांचे मत आहे. दया, प्रेम, सत्याचरण या दृष्टीने चार