पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९१)

हजार वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांपेक्षा आपण काकणभरही पुढे गेलेलो नाही असे डीन इंग, अल्फ्रेड, रसेल, बॅलेस् वगैरे पंडित म्हणतात. सुख हे माप धरले तरी आगगाडी, विमान, टेलिफोन, सिनेमा इत्यादि साधने असून मानवाचे सुख सुईच्या अग्राइतकेही वाढलेले नाही असे कित्येक म्हणतात व काही आणखी पुढे जाऊन म्हणतात की, खातेऱ्यात लोळणाऱ्या गाढवाच्या सुखात, गणितात मग्न होणाऱ्या न्यूटनच्या सुखांत व समाधी लावून ब्रह्मलीन होणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या सुखात काही फरक असेल असे आम्हास वाटत नाही व गाढवाच्या सुखाची तुम्हाला मुळीच जाणीव नसल्यामुळे तुम्हाला त्यात काही सांगण्याचा अधिकार नाही. याच्या उलट आजच्या मानवाने बुद्धीला प्रमाण मानून परमार्थाचा भ्रम झुगारून दिल्यामुळे तो फार सुखी झाला आहे, असेही म्हणणारे लोक आहेत. हे सर्व पाहिले आपल्या सामान्य बुद्धीचा मोठा गोंधळ उडून जातो. आपल्या स्थिर कल्पना पाचोळ्यासारख्या उडून गेल्यामुळे मनाला मोठा खेद होतो. संस्कृती म्हणजे हे लोक म्हणतात तरी काय, असा प्रश्न उत्पन्न होतो.
 त्यालाही उत्तर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. कोणत्या समाजाला सुसंस्कृत म्हणावे असे विचारताच (१) ज्यात माणूसकीची वाढ झाली आहे तो (अर्नोल्ड) (२) ज्यांत बुद्धीच्या विकासाला वाव आहे तो, (माँटेस्क्यू) (३) परिस्थितीशी जमवून घेण्याची ज्यांत जास्त शक्ती आहे तो (४) चिकित्सकबुद्धी व परमेश्वरी इच्छा यांना प्राधान्य देणारा, (५) विज्ञान व प्रेम यांच्या नेतृत्वाने चालणारा. (रसेल), (६) एकमेकांच्या फायद्यासाठी ज्यांत लोक झटतात तो, (७) वासना मारून टाकून कर्मसंन्यासमार्गाने मोक्षसाधणारे लोक जास्त आहेत तो, (८) कर्मयोग मार्गाने मोक्ष साधणारे ज्यात जास्त आहेत तो; अशी अनेक उत्तरे आपणास पंडितांच्याकडून मिळतात व पुन्हा मन गोंधळून जाऊन इतक्या भिन्न व्याख्या करण्याजोगी अशी काय भिन्न धोरणे यांनी मनात धरली होती, म्हणजे कोणच्या मापांनी हे समाजाला मोजावयास प्रवृत्त झाले होते हा पहिलाच प्रश्न पुन्हा उभा राहातो.
 अमुक व्यक्ती किंवा समाज श्रेष्ठ असे सांगताना आपल्या मनात जसे काही माप असावे लागते, त्याचप्रमाणे अमके राष्ट्र प्रगतिमान् आहे तमके मागासलेले आहे असे म्हणताना आपल्या मनात काही ध्येय ठरलेले असावे