पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८९)



संस्कृति आणि प्रगति.



 पशूपेक्षा मनुष्य श्रेष्ठ असे आपण म्हणतो. त्या वेळी सर्व पशू सारखे व सर्व मानव सारखे असे आपल्या मनात मुळीच नसते. पशूमध्येही आपण प्रतवारी लावतोच. गाढव, टोणगा यांच्यापेक्षा घोडा, हत्ती व त्यांच्यापेक्षा वाघ, सिंह हे पशू आपण श्रेष्ठ समजतो. माणसातही तसेच आहे. निग्रोपेक्षा रेड इंडियन, त्याच्यापेक्षा चिनी व चिन्यापेक्षा युरोपी श्रेष्ठ अशी प्रतवारी लावली जाते. व्यक्तीव्यक्तीमध्येसुद्धा आपण मनाने तुलना करीत असतो. चंगीझखानापेक्षा नेपोलियन व नेपोलियनपेक्षा शिवाजी श्रेष्ठ असे काही लोक समजतात. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राराष्ट्रामध्येही श्रेष्ठकनिष्ठता लाविली जाते. काहींच्या मताने हिंदुस्थान, चीन ही मागासलेली राष्ट्र असून इंग्लंड, जर्मनी, अमेरिका आज श्रेष्ठ आहेत. पण उलट, इंग्लंडजर्मनीपेक्षा आजही हिंदुस्थान श्रेष्ठ आहे असे काहींचे मत आहे. याहीपेक्षा मोठे विभाग करून पाश्चात्य संस्कृती श्रेष्ठ की पौर्वात्य असा वाद घातला जातो व त्यावरही उलट सुलट मते आपण देतो व ऐकतो.
 हा श्रेष्ठकनिष्ठतेचा रूढ झालेला विचार पाहिला म्हणजे असे पक्के वाटू लागते की अमुक श्रेष्ठ व अमुक कनिष्ठ असे जो ठरवितो त्याच्याजवळ त्या श्रेष्ठकनिष्ठतेचे मोजमाप करता येईल असे काही तरी साधन खास असले पाहिजे. ते साधन कोणचे व तेच तू का वापरतोस असे विचारले. तर प्रत्येकाला सांगता येईल असे नाही. पण प्रत्येकाच्या मनात त्या वेळी ते अस्पष्टपणे का होईना ठरलेले असले पाहिजे यात शंका नाही. पण हे साधन आपण तपासून पाहू लागलो तर मात्र आपला गोंधळ उडून जातो. गाढवापेक्षा बैल श्रेष्ठ का तर बैलाचा उपयोग जास्त म्हणून. म्हणजे येथे उपयुक्तता हे माप आहे. पण गाढवापेक्षा सिंह श्रेष्ठ असे म्हणताना उपयुक्तता हे माप लावून बोलतो असे म्हणता येईल काय? माणसामाणसात श्रेष्ठकनिष्ठ ठरविताना असेच प्रश्न निर्माण होतात. शेतकरी सर्व जगाला अन्न पुरवितो व कोष्टी वस्त्र देतो. पण शिरप्या किंवा कोळया यांच्यापेक्षा कोणाचेही पोट न भरणारे जे गंधर्व किंवा रविवर्मा त्यांना आपण श्रेष्ठ समजतो व त्याचांच