पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८८)

कांदेलसूण खावे की नाही, शुद्धीसाठी गोमूत्र प्यावे की काय हे अंतर्दृष्टीवर उभारलेल्या धर्मशास्त्राला विचारण्यापेक्षा प्रयोगावर उभारलेल्या वैद्यकशास्त्राला विचारणे जास्त चांगले. धर्मशास्त्र हेही प्रयोगावरच उभारले आहे असे काही लोक सांगतात. तसे असले तर उत्तमच. कारण मग भौतिक शास्त्रात जसे आपण नित्य प्रयोग करून जुने चुकीचे ठरल्यास किंवा कमी हितावह ठरल्यास ते टाकून देऊन नवीन घेतो, तसेच धर्मांतही करता येईल. पण धर्मनिष्ठ लोक त्यालाच तयार होत नाहीत, म्हणून तर सर्व प्रश्न उद्भवतो. आहार, स्नानसंध्या, येथपासून पुर्नविवाह, जातिभेद येथपर्यंत सर्व प्रश्न जर धर्माने विज्ञानाच्या साह्याने सोडविले तर मग वादच राहाणार नाही.
 भौतिक शास्त्रे ही मानवाची वासना पूर्ण करण्याच्याच कामी फक्त उपयोगी पडतात, व मानवाची वासना पूर्ण करू पाहणे हे सशाच्या शिंगाचा शोध करण्यासारखे आहे म्हणून ती शास्त्रे फार कमी दर्जाची आहेत, असे रा. गो. म. जोशी यांनी म्हटले आहे. पण मानवाची वासना मुळातच नाहीशी करून टाकणे, इतकेच काय पण तिला इष्ट वळण लावणे, हे जे धर्मशास्त्राचे काम ते कितपत शक्य आहे व शक्य झाले आहे ते कोणास सांगावयास नकोच आहे. तेव्हा धर्माचा हा प्रयत्न कोणाचे शिंग शोधण्यासारखा आहे ते जोशांनी एकदा जाहीर करावे. वास्तविक नीती व विज्ञान या दोन्ही गोष्टी समाजाला सारख्याच महत्वाच्या आहेत. विज्ञानाने सामर्थ्य निर्माण होते. त्याचा मानवाला कल्याणप्रद उपयोग कसा करावा हे नीतिशास्त्र सांगते. पण उलट नीती काय व अनीती काय हे ठरविण्याला परिस्थितीचे जे ज्ञान लागते ते विज्ञानावाचून अशक्य आहे. म्हणून या दोहींचे महत्त्व ज्या समाजात सारखेच मानले जाईल, व धर्म, नीति व आचार हे विज्ञानाच्या पायावरच जेथे उभारले जातील तोच समाज समर्थ व सुखी होईल यात शंका नाही.