पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)

सुधारलेल्या लोकातसुद्धा धर्माच्या आज्ञा म्हणून पाळल्या जात असत. एकाच काळी स्त्रीने अनेक पती करणे, वधूचा प्रथम संभोग गुरु, राजा किवा टोळीचा नायक यांना देणे. मित्राला इतर आदरातिथ्याबरोबरच काही दिवस बायको किंवा मुलगी देणे या व असल्या कित्येक चाली कितीतरी देशांत रूढ होत्या प्रत्येक मुलीने ॲफ्रोडाइटच्या मंदिरात जाऊन प्रथम भेटेल त्या पुरुषाशी संगत व्हावे अशी बाबिलोनमध्ये रूढी होती. (जोसेफ मॅक्केबूकृंत Evolution of Marriage व लिओ मार्कन् कृत Prostitution in the ancient world ही पुस्तके पहा.) पण मागच्या चालींचीच उदाहरणे देण्याची जरूर आहे असे नाही आपली पत्नी व कन्या भक्तिभावाने सद्गुरूला अर्पण करून मोक्ष मिळविणारे लोक आजच्या सुशिक्षित समाजातही सापडतात. तेव्हा सायन्स हे मानवी संस्कृतीचे थडगे रचणार आहे असे सांगणाऱ्यांनी धर्माने काय रचले आहे हे जाणणे जरूर आहे.
 आज सुशिक्षित म्हणविणारे जे आपण त्यांच्यातही अमक्या वारी अमुक खाऊ नये तमक्या वारी तमुक करू नये, परदेशांत गेल्याने पाप लागते व गोमूत्र प्यायल्याने ते जाते, असल्या वेडगळ समजुती दृढमूल होऊन बसल्या आहेत या सर्वाचे कारण हेच की आपला आचार चांगला की वाईट हे ठरविण्याची कसोटी काह तरी अलौकिक, आपल्याला न समजेल अशी, केवळ अंतर्दृष्टीनेच जाणता येण्याजोगी अशी असावी असे लोकांना वाटते. ही समजूत दूर होऊन प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या पायावर उभारून त्याअन्वये आचार ठेवावा असे लोकांना वाटू लागले तर समाजाच्या शक्तीचा चाललेला अपव्यय थांबेल असे वाटते.
 धर्म, नीती, आचार हे सर्व आधिभौतिक शास्त्रांच्या कसोटीने स्वीकारल्यानंतर आपल्या समाजात एकदम क्रान्ती होऊन जाईल व नंदनवनाचे सुख खाली येईल असे म्हणण्याचा मुळीच उद्देश नाही. मानवाची बुद्धी मर्यादित आहे व विचारांपेक्षा विकारांची सत्ता त्याच्या मनावर जास्त चालते. त्यामुळे भौतिक शास्त्रे प्रमाण मानल्याबरोबर सुखाचे साम्राज्य पसरेल असे कधीच कोणी म्हणणार नाही. पण अंतर्दृष्टीपेक्षा, अवलोकन, अनुभव व प्रयोग ही ज्ञानसाधने श्रेष्ठ असल्यामुळे त्यांनी मिळविलेल्या ज्ञानावरून काही निष्कर्ष काढले तर ते जास्त सुखावह होतील, एवढेच सांगावयाचे आहे. चातुर्मासात