पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८६)

आनुवंशिक संबंध काही नाही असे तिसऱ्याने सांगितले आहे. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार विवाह- प्रकरणी व्हावयास पाहिजे. धर्मशास्त्रात अमुक सांगितले आहे एवढा आधार कोणच्याही गोष्टीला पुरेसा नाही. पुनर्विवाह करावा की न करावा हे त्या विवाहाने त्या स्त्रीच्या अपत्यावर व एकंदर समाजावर परिणाम काय होईल ते पाहूनच फक्त ठरविले पाहिजे. परलोकाचा कोणताही विचार समाजविचारात घुसू देता कामा नये. कारण परलोक अजून सिद्ध झाला नाही व तो असला तरी तो व त्याचे इहलोकाशी असलेले संबंध जाणण्यासाठी अंतर्दृष्टी या अत्यंत अविश्वसनीय साधनाखेरीज दुसरे साधन नसल्यामुळे त्याचा विचार करणेच शक्य नाही.
 नीतिकल्पनांचा उदय व वाढ या आपल्या ग्रंथांत वेस्टमार्कने निरनिराळ्या धर्मांमध्ये- अगदी रानटी टोळयांपासून अत्यंत सुसंस्कृत समाजापर्यंत सर्व लोकांमध्ये कित्येक विचित्र नीतिकल्पना कशा रूढ होत्या ते सांगितले आहे. ते सर्व वाचले म्हणजे कारणमीमांसा न करतात केवळ धर्मक्षेत्रातल्या काल्पनिक कारणावर विसंबून समाजाचे नियम बनविणे कसे घातुक आहे, हे चांगले दिसून येईल.
 बालहत्येची चाल तर जुन्या काळी अगदी सर्रहा चालू होती आणि ती केवळ रानटी टोळ्यांत नसून ट्युटॉनिक, चिनी, आरब, रजपूत यांसारख्या सुधारलेल्या लोकांमध्येही होती. त्यातल्या त्यात एक फरक मोठा ध्यानात घेण्याजोगा आहे. अथेन्स स्पार्टा, रोम या संस्कृत राष्ट्रांमध्येही बालहत्या मान्य असे. प्लेटो, ॲरिस्टॉटल यांसारखे पंडितही तिचा पुरस्कार करीत. पण हे लोक अलौकिक धर्मविचारांनी बालहत्या करीत नसल्यामुळे दुर्बल, रोगी अशी मुले तरच मारावी असा तरी विवेक ते पहात. असे पण धार्मिक समजुतीनेच जेथे बालहत्या होत असे तेथे दुर्बल मूल जगविण्यासाठी त्याच्याच सशक्त भावंडाला मारून त्याचे मांस दुर्बलाला भरविण्याची चाल असल्याचे आपणास दिसून येते. एक सोडून एक मूल मारावे अशीही पद्धत पुष्कळ ठिकाणी होती. यावरून धार्मिक समजुतीच्या बुडाशी कारणमीमांसा असणे किती जरूर आहे हे ध्यानात येईल.
 वैवाहिक नीतीसंबंधी वरीलप्रमाणेच हकीगत आहे. ज्या चाली आपल्याला अत्यंत किळसवाण्या वाटतात, तसल्या कित्येक चाली रानटी व