पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८५)

 येथपर्यंतच्या विवेचनावरून असे ध्यानात येईल की प्रत्यक्ष अनुभव. अवलोकन प्रयोग यांच्या साह्याने मिळविले ले जे ज्ञान तेच सर्वांत जास्त विश्वसनीय असते. व आधिभौतिक शास्त्र ही याच पद्धतीने ज्ञान मिळवीत असल्याकारणाने धर्म- अधर्म, नीती- अनीती हे सर्व त्यांच्याच आधाराने ठरविले पाहिजे. अतींद्रिय सृष्टीतले ज्ञान मिळविण्यास आपणास काहीच साधन नाही. अंतर्दृष्टी हे साधन अगदीच भ्रामक व अविश्वसनीय आहे असेही आपण पाहिले. त्याचप्रमाणे भौतिक शास्त्रावर त्यांच्या विरोधकांनी किंवा अर्धवट मित्रांनी जे आक्षेप घेतले आहेत त्यांतही काही जीव नाही असेही आपल्या ध्यानात आले. आता या भौतिकशास्त्रांचा सल्ला दर ठिकाणी आपणास कसा कल्याणकारक होईल हे निरनिराळ्या क्षेत्रांतली उदाहरणे घेऊन विशद करून दाखविले की या प्रकरणाचे काम संपले.
 एक विवाह हाच विषय घेतला तर त्यांत शरीरविज्ञान, अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, मानसशास्त्र इत्यादि अनेक शास्त्रांचा सल्ला घेऊनच काय ते निश्चित करावे लागेल. कोणाच्या दोन गटातील स्त्री-पुरुषांचा विवाह व्हावा हे तसले विवाह जेथे झाले असतील तेथे त्याचे परिणाम काय झाले हे पाहूनच ठरवावयास पाहिजे. आपल्या स्मृतीत याचा विचार केला असेलच असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कारण केला आहे की नाही ते त्यांनी दिले नाही. विचार करून कारणमीमांसा ठरवून जर त्यांनी नियम सांगितले असतील तर ते नियम पुन्हा तपासून पाहून नव्या परिस्थितीत हितावह आहेत की नाही हे पाहण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा स्मृतीतील विधाने विचारात घ्यावी हे खरे. आधिभौतिक शास्त्रांच्या कसोटीवर घासल्यावाचून ती प्रमाण मानू नयेत इतकाच भावार्थ. कारण ब्राह्म, गांधर्व वगैरे विवाहपद्धती सांगून अमक्या वर्णाला अमकी हितकर असे जे मनूने सांगितले आहे, त्यात काही अर्थ नाही. कोणचेही विज्ञान त्याला पाठिंबा देणार नाही. वधूवरांच्या वयाबद्दलचे तसेच सकरजप्रजेसंबंधीचे मनूचे म्हणणे टिकण्याजोगे नाही. या व इतर बाबतीत अर्वाचीन संशोधकांनी पुष्कळच अभ्यास केला आहे. आते- मामेबहिणीशी जे लग्न करतात त्यांच्या संततीत वेडेपणा, मानसिक दौर्बल्य फार अढळते असे एक शास्त्रज्ञ म्हणतो. वधूवरांच्या वयांत दहापेक्षा जास्त अंतर असू नये असे दुसऱ्याने म्हटले आहे. आईच्या व मुलीच्या प्रसवशक्तीत,