पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८४)

वाटते तो भ्रम आहे, हे ध्यानात घेताच तू मुक्त होशील. अद्वैत सांगताना म्हणावयाचे की, ब्रह्म, व आत्मा हे एकच आहेत व आत्म्याला आपण निराळे आहोत असे वाटते तो भ्रम आहे. कर्मवाद सांगताना म्हणावयाचे की कारणे सांगता येत नाहीत हे खरे; पण आत्मा बद्ध होतो हे खास, आणि पुन्हा मोक्ष कसा मिळेल असे विचारताच, आत्म्याची साक्ष काढून तो स्वतंत्र आहे असे ठरवायचे. वेदान्ताचा हा असा गोंधळ आहे, आणि वेदान्ताचाच आहे असे नाही. तत्त्वज्ञानाची कोणचीही शाखा गोंधळावाचून अशक्य आहे.
 कर्माच्या नियमांनी आत्मा बद्ध होतो, असे तरी म्हणावे किंवा होत नाही असे तरी म्हणावे; किंवा कर्माचे नियम तितकेसे कठोर नाहीत, काही कर्माची फळे कदाचित् न मिळणे शक्य आहे असे तरी म्हणावे पण यातला कोणताही पक्ष धर्मशास्त्राला स्वीकारणे शक्य नाही. ते आपल्या सोयीप्रमाणे आत्म्याला थोडासा स्वतंत्र मानणार, आणि सगळे मानण्या न मानण्यावरच अवलंबून असेल तर शास्त्र कशाला सांगता असे विचारले तर उत्तर मिळणार नाही. यावरून असे दिसेल की कार्यकारणभाव पतकरण्याने जी अडचण येते तीच कर्मवादात येते आणि याच्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की कार्यकारणभाव पतकरण्याने वरील अडचण नाहीशी होते. इतकेच नव्हे तर नीतिनियमन हे जडवादालाच फक्त शक्य आहेत. कसे ते पहा.
 जडवाद्यांच्या मताने मन व इतर पदार्थ यांत तात्त्विक फरक मुळीच नाही. मनाचे व्यापार फार सूक्ष्म व इतरांचे स्थूल इतकाच फरक. हे ध्यानात ठेवले तर नीतिनियमन याच पंथांत कसे शक्य आहेत ते ध्यानात येईल. फुलांचा जसा वास, शब्दांचा जसा नाद, तशाच मनाच्या रागद्वेषाच्या उर्मी आहेत. एखाद्या झाडाच्या कुजक्या फांद्या तोडून टाकून त्याच्या बुडाशी खत पाणी घालणे हे जितके साधे आहे तितकेच मनाच्या उर्मी म्हणजे रागद्वेष हे तितक्याच सूक्ष्म अशा दुसऱ्या रागद्वेषाने बदलणे साधे आहे. झाडांच्या कुजलेल्या फांद्या म्हणजे काही कणांचा समूह चाकूने म्हणजे दुसऱ्या काही कणांच्या समूहाने जसा आपण दूर करतो तशाच मनातल्या अधम किंवा कुत्सित भावना हा जो अत्यंत सूक्ष्म कणांचा समूह तो प्रेमाने किंवा क्रोधाने म्हणजे दुसऱ्या तसल्याच सूक्ष्म कणसमूहाने दूर करावयाचा म्हणजेच नीतिशास्त्र सांगावयाचे.