पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८३)

एकदा कर्मबद्ध झाला म्हणजे चांगले वाईट करणे हे सुद्धा त्याच्या हाती नाही; इच्छा नसताही मनुष्यांच्या हातून पापे होतात, असे गीताकारच म्हणतात. मनुष्याला वासना होतात त्याही पूर्वकर्मानुसारच होतात व त्याची बुद्धी हीसुद्धा कर्मानुसारिणीच असते. जडवादामध्ये मागल्या क्षणाच्या कारणामुळे पुढच्या क्षणाचे कार्य होत असते व मनाला स्वातंत्र्य नसते; तीच स्थिती कर्मवादात निर्माण होते. मागल्या कारणावर पुढचे कार्य असे न म्हणता मागल्या कर्मावर पुढची वासना व वर्तन अवलंबून असते असे म्हणावयाचे इतकाच फरक. कर्माचा हा नियम न मानावा तर कृतकर्माची फळे भोगावी लागत नाहीत, असे होऊन पुण्य कर असे सांगण्याला काहीच अर्थ राहाणार नाही; आणि जन्मतःच एक दरिद्री, एक श्रीमंत, एक शूर तर दुसरा भ्याड कां व्हावा याची उपपत्तीही नीट लावता येणार नाही. व मग मोक्षधर्मशास्त्राचा पायाच उखडला जाईल. यातून सुटण्यासाठी वेदान्ती आत्म्याची साक्ष घेतात. मी स्वतंत्र आहे. वाटेल ते करू शकेन असे जे मनुष्याला वाटत असते, त्यावरूनच कर्माने बद्ध अशा सृष्टीच्या पलीकडे स्वतंत्र अशी ब्रह्मसृष्टी आहे व आत्मा त्या ब्रह्मांचाच अंश असल्यामुळे त्यालाही स्वातंत्र्य आहे असे ते मानतात; पण आत्म्याची ही साक्ष फुकट आहे. मी स्वतंत्र आहे, हे जसे आत्म्याला वाटते तसेच मी ब्रह्माहून निराळा आहे असेही आत्म्याला वाटते; पण या दुसऱ्या वाटण्याला मात्र वेदान्ती भ्रम आहे असे म्हणतात हा जर भ्रम आहे तर 'मी स्वतंत्र आहे' असे वाटणे हाही भ्रम असणे शक्य आहे. आणि दुसरे असे की, ब्रह्माचा अंश म्हणून आत्मा जर स्वतंत्र धरावयाचा तर तो मुळातच बद्ध का व्हावा असा प्रश्न उत्पन्न होतो. पण मुळात तो बद्ध का होतो, हे आम्हास सांगता यावयाचे नाही असे वेदान्ती म्हणतात. माता हा केवढा द्राविडी प्राणायाम आहे पहा. ब्रह्म हे अविभाज्य व स्वतंत्र आहे. असे असताना प्रथम आत्मा त्यातून विभक्त होतो असे मानावयाचे. मग तो कर्माच्या कठोर कायद्यांनी बद्ध होतो असे मानावयाचे. मग मोक्षधर्माला जरूर म्हणून त्या आम्याची भ्रामक साक्ष घ्यावयाची व तिच्या जोरावर तो स्वतंत्र आहे 'तोही थोडासाच- कारण फार स्वतंत्र मानला तर नीतीशास्त्र ओरडेल) असे मानावयाचे; आणि मग त्या अर्धवट बद्ध मानलेल्या आत्म्याला म्हणावयाचे की, बाबारे, तू पूर्ण स्वतंत्र आहेस, आपण बद्ध आहो असे तुला