पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

शास्त्राचा व्याप अलीकडे अत्यंत वाढला आहे. बुद्धिबळाच्या खेळात एकादे प्यादे जरी हलवावयाचे असले तरी त्या हलविण्याने पुढे काय काय परिणाम होतील, म्हणजे कोणाचा जोर निघून जाईल कोण मरू शकेल, नवा जोर कोणाला येईल, रिकाम्या पडलेल्या घरात प्रतिपक्षाचे कोणते मोहरे घुसू शकेल, ते काय अनर्थ करील, शह कोणाला बसतील, इत्यादि परिणाम- परंपरा ज्याच्या ध्यानात येते, त्याला ते प्यादे हलविताना फार विचार करावा लागतो. ज्याच्या या भानगडी ध्यानात येत नाहीत, तो चटकन् ते पुढे सारून मोकळा होतो. पण मग त्याचे परिणामही त्याला भोगावे लागतात. समाजशास्त्राचे काहीसे तसेच झाले आहे.
 मानवीसमाज किती प्रकारांनी हलतो, मनुष्याच्या मनाला प्रेरणा देणाऱ्या किती प्रकारच्या शक्ती आहेत. यांसंबंधी आज कितीतरी व्यापक प्रमाणावर अभ्यास चालू आहे. मानवाच्या प्रत्येक हालचालीच्या बुडाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अर्थशास्त्राचा म्हणजे भाकरीचा प्रश्न असतो, असे काही लोक म्हणतात. अशोकाने अहिंसा स्वीकारली किंवा शिवाजीने स्वराज्य स्थापना केली, याला मुळात भाकरीच कारण असली पाहिजे, असे या पक्षाचे मत आहे. उलट प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी कामविकार असतो असे म्हणणारा दुसरा एक पंथ आहे. आईच्या अंगावर स्तनपान करणाऱ्या बालकाच्या मनातही कामप्रेरणाच असते, म्हणजे भाकरीच्या बुडाशीही कामप्रेरणा असते, असे सांगणारे काही पंडित आहेत. अर्थात् मानवी हालचालीची जो जशी भिन्न उपपत्ती लावील, तसे त्या समाजाच्या कल्याणासाठी त्याने सांगितलेले उपायही भिन्न असणार हे उघड आहे. अर्थ व काम याप्रमाणेच आनुवंशानेच माणसाचे भवितव्य ठरत असते, असे समजणाराही एक पंडितवर्ग आहे. डार्विन हा सृष्टीशास्त्रज्ञ का झाला, पाश्चर वैद्य का झाला, याची कारणे त्यांच्या पूर्वजांच्या रक्तातच सापडतात असे त्यांना वाटते. यांचे वडील, पितामह, प्रपितामह, यापैकी कोणीतरी पूर्वज सृष्टीशास्त्रज्ञ व वैद्य असलाच पाहिजे; तो नसला तर त्यांच्या आईकडचा कोणीतरी पूर्वज तसा असला पाहिजे, असे सांगितल्यावाचून या लोकांचे समाधान होत नाही. हे जसे व्यक्तीचे तसेच समाजाचेही भवितव्य रक्तावर अवलंबून आहे. मोठ्या रक्ताच्या कुळातच मोठी माणसे होणार. यस्मिन् कुले त्वमृत्पन्नः गजस्तत्र