पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

वाढला आहे हे तर आहेच; पण आणखीही अनेक कारणे आहेत. माणसांच्या हालचालीची क्षेत्रे पूर्वीपेक्षा अनंत पटीनी आता वाढली आहेत. पूर्वी कधीच आला नसेल इतका दूरदूरच्या राष्ट्रांशी संबंध आता हरघडी येतो. इहलोक व परलोक यांच्या कमीअधिक महत्त्वासंबंधी लोकांचा दृष्टिकोन विज्ञानाने पार बदलून गेला आहे. मानवाचे व देवाचे नाते बदलले आहे, इतकेच नव्हे तर व्यक्तींव्यक्तीचे एकमेकाशी असलेले व शेवटी व्यक्तीचे समाजाशी असलेले नातेही आता बदलत आहे. जुने समाजशास्त्र आमूलाग्र बदलून जाण्यास आणखीही एक कारण झाले आहे. या मध्यंतरीच्या काळात व विशेषतः गेल्या एक-दोन शतकांत आधिभौतिकशास्त्रांनी मानवाच्या ज्ञानात कल्पनातीत भर टाकली आहे. आनुवंशशास्त्र, सुप्रजाशास्त्र, भूस्तरशास्त्र, मानवशास्त्र, जीवनशास्त्र, मानसशास्त्र, मनोविश्लेषणशास्त्र इत्यादि अनेक शास्त्र व त्यांच्या अनेक शाखा-उपशाखा यांनी मानवासंबंधाची अनेक प्रकारची नवीन माहिती उपलब्ध करून दिली आहे. आणि त्यामुळे जुन्या व आता चुकीच्या ठरलेल्या माहितीच्या आधारे रचलेले नियम अर्थातच त्याज्य ठरून त्या जागी नवे नियम करणे आवश्यक होऊन बसले आहे.
 समाजाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीतही एक फार महत्त्वाचा फरक अलीकडे पडला आहे. बालविवाहाने जास्त मृत्यू होतात. संकराने निर्वंश होतो, बुद्धिमान वर्ग किंवा श्रीमंतवर्ग लवकर नष्ट होतो; ही व यासारखी कोणतीही विधाने करावयाची असली तरी त्यासाठी त्या त्या समाजांत जाऊन तेथे झालेले परिणाम आकड्यांनी मोजून मगच निर्णय करावयाचा, अशी पद्धत अलीकडे रूढ होत चालली आहे. या पद्धतीला आकडेशास्त्र असे म्हणण्याची चाल पडत आहे. ते कितपत युक्त आहे, हे मला सांगता येत नाही. पण ही पद्धत समाजाच्या अभ्यासाला अत्यंत उपकारक झाली आहे, याबद्दल मात्र शंका नाही. आपल्या आसपास दृष्टी टाकून तेवढ्यावरूनच निर्णय काढण्याची माणसांना सवय झालेली असते. असले निर्णय किती भ्रामक असतात, ते आकडेशास्त्राने दाखविले आहे.
 ज्ञानामध्ये भर पडली व अभ्यासाच्या नव्या आणि उत्तम पद्धती सापडल्या, यांमुळे समाजशास्त्राचा अभ्यास जास्त सूक्ष्म तऱ्हेने व जास्त निश्चितपणे करता येऊ लागला हे खरे; पण या दोन कारणांमुळेच समाज-