पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

न हन्यते । या प्रकारचे यांचे तत्त्वज्ञान आहे. उलट बिहेवियरिस्ट नावाचा एक अमेरिकेत पंथ आहे, त्याचे मत असे आहे की, आनुवंश वगैरे तर काहीच नाही; पण अमुक मुलगा बुद्धिमान, अमुक मंद यालाही काही अर्थ नाही. योग्य परिस्थितीत व योग्य संस्कार घडवले तर वाटेल त्या मुलाला वाटेल त्या उच्चनीच स्थितीला नेऊन पोचविता येईल. उत्क्रांतीवादी नावाचा आणखी एक पक्ष आहे. त्यांच्या मताप्रमाणे मानवाचा व एकंदर सर्वच गोष्टीचा हळूहळू विकास होत जाण्याची सृष्टीरचनेतच योजना आहे. म्हणजे मानवाने प्रयत्न कितीही केला, तरी उत्क्रांतीच्या त्या पायरीपर्यंत सृष्टीक्रमाने तो आला नसला तर त्याला इष्ट कार्यात कधीच यश यावयाचे नाही. झाड जसे अकाली फुलत नाही, व फळं धरीत नाही, खतपाणी घालून कितीही निगा राखली तरी आतून क्रमाने विकास होत तयारी झाली म्हणजे मगच योग्य हंगामी त्याला फळे-फुले येतात, त्याचप्रमाणे समाजाचे आहे. त्या त्या काली सर्व गोष्टी क्रमानेच घडत जातात आणि हा सृष्टीचा क्रम पाहिला तर उत्तरोत्तर मानवाची उन्नती होत जावी असा आहे असे या पंथाचे म्हणणे आहे. याशिवाय भौगोलिक परिस्थिती, परमेश्वरी कृपा, पूर्वकर्म इत्यादि माणसाची भवितव्ये ठरविणाऱ्या अनेक शक्ती आहेत असे सांगितले जाते. यात वाईट एवढंच आहे की, प्रत्येकजण आपापली उपपत्ती पूर्णपणे खरी व इतरांची चुकीची असे समजून अगदी एकांतिकपणा करतो. आणि त्यामुळेच सर्व नुकसान होते. वस्तुस्थिती अशी आहे की, भाकरी, कामविकार, संस्कार, आनुवंश, उत्क्रांती, भौगोलिक परिस्थिती आणि यदृच्छा (म्हणजे मानवांना ज्याचे आकलन झाले नाही अशा शक्ती) या सर्वच मानवाचे भवितव्य ठरवीत असतात. आणि म्हणून समाजशास्त्रज्ञांना या सर्व शक्ती विचारात घ्याव्या लागतात. आणि एवढ्यानेच हे भागत नाही. या सर्व शक्ती निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रमाणात मानवी मनांवर कार्य करीत असल्यामुळे त्या त्या विशिष्ट काळचा अभ्यासही करावा लागतो. धर्माचा मागल्या काळी लोकांवर विलक्षण पगडा असे. मनस्मृतीमध्ये जे दंडक घालून दिले आहेत त्यासंबंधी विवेचन करताना पुष्कळ वेळा हे मोडले तर चांडाळयोनी प्राप्त होईल, नरकात जावे लागेल असे सांगितलेले आढळते. आणि माणसांना ते शेकडोशे वर्षे खरे वाटत असे; आणि अजूनही पुष्कळांना