पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८२)

फुलातून जसे भिन्न भिन्न गंधांचे कण निघत असतात त्याचप्रमाणे मनातून त्याहीपेक्षा सूक्ष्म असे रागद्वेषाचे कण निघत असतात व विचारविकारांच्या लहरी म्हणजे याच कणांचे आघात किंवा प्रत्याघात होत.
 यावर धर्मशास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, शरीराप्रमाणेच मन हेही जड आहे व तेही जड वस्तूप्रमाणेच कार्यकारणांनी बद्ध आहे असे जर तुम्ही म्हणाला तर नीतिअनीतिबद्दल एक चकार शब्दही तुम्हाला काढता येणार नाही. मन हे जर कार्यकारणभावाने बद्ध असेल तर त्याची स्थिती दगडाप्रमाणेच आहे. मागल्या क्षणाच्या अवस्थेवर त्याची पुढल्या क्षणाची अवस्था अवलंबून असणार. ती पालटण्याचे दगडात जसे सामर्थ्य नाही तसे मनातही नाही. मनात जर हे सामर्थ्य नाही म्हणजे कोणचीच क्रिया किंवा विचार करण्याचे स्वातंत्र्य जर त्याला नाही तर त्याला अमुक कर, तमुक कर असा उपदेश करणे हे दगडाला उपदेश करण्याइतकेच अर्थशून्य आहे. तेव्हा आत्मा नाही किंवा मनाला स्वातंत्र्य नाही असे तुम्हास मानावयाचे असल्यास माना पण मग नीती- अनाीतीचा विचार तुम्हाला मुळीच सांगता येणार नाही. नीतिशास्त्रप्रवेश या आपल्या ग्रंथांत प्रो. वा. म. जोशी यांनी याच तऱ्हेचे विचार सांगितले आहेत. ते म्हणतात की, आत्म्याला जड मानले तर नीतिशास्त्राच्या मुळावरच कुठार घातल्यासारखे होईल. रसेलच्या जडवादावर टीका करताना रा. गो. म. जोशी यांनी असेच म्हटले आहे इतरही अनेक पंडितांचे असेच मत आहे.
 नीतीविशारदारांच्या या आक्षेपाला दोन प्रकारे उत्तर देता येईल. एक म्हणजे मन जड कोटीत घातले तर नीती-आनीतीचा उपदेश व्यर्थ आहे हे त्यांचे विधान बरोबर नाही. त्याची मीमांसा पुढे येईलच; पण दुसरे असे की. जडवादावर त्यांनी जो आक्षेप घेतला आहे तो त्यांच्यावरही तितक्याच जोराने परत फिरतो हे ते विसरतात. धर्मशास्त्रामध्ये कर्मविपाकाचे महत्त्व फार आहे. आणि कर्माचे नियम कठोर व दुर्लंघ्य आहेत असे म्हणतात. कर्मचत्र एकदा सुरू झाले म्हणजे त्यांत कधी खळ पडत नाही. जी जी कृत्ये मानव करतो त्या त्या कृत्यांची फले म्हणजेच त्याचे कर्म हे मेल्यानंतरही त्याच्याबरोबर जात असते. इतकेच काय, पण एका महाप्रलयानंतरही ते नष्ट न होता प्रत्येक जीवाच्या वाटणीला ते जसेच्या तसे येते; आणि जीव