पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८१)

 धर्मशास्त्राचा एकेक प्रांत काबीज करीत विज्ञानाने ऐहिक विषयाचे तर सर्व क्षेत्र व्यापलेच आहे व आता मोक्षधर्मशास्त्राला त्याच्या स्वतःच्या घरातच विज्ञानाने शह दिला आहे. जडवस्तूंचे व्यापार उकलता उकलता मानवाचाही अभ्यास विज्ञानाने सुरू केला. त्याच्या जड देहाचे सर्व शास्त्र हस्तगत झालेच आहे व आता मनाबद्दलही विज्ञान काही सिद्धान्त सांगू लागले आहे. मन हा धर्मशास्त्राचा बालेकिल्ला आहे. त्याचे जे व्यापार चालतात ते आत्म्याचे अस्तित्व मानल्यावाचून स्पष्ट करणे अशक्य आहे असे धर्मशास्त्र म्हणते. पण तेही चुकीचे आहे, असे अलीकडचे शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. त्यांचे म्हणणे असे मनाचे व्यापार आम्हास सर्वस्वी उकलता आले आहेत असे आम्ही म्हणत नाही पण आतापर्यंत जो काही अभ्यास झाला आहे, त्यावरून एवढे मात्र खास सांगता येते की, ते उकलण्यासाठी आत्मा म्हणून एक काही देहनाशानंतर टिकून रहाणारे व अविनाशी तत्त्व आहे असे मानण्याची मुळीच जरूर नाही. आत्मा किंवा परमेश्वर यांच्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टीवरून ते सिद्ध होतात असे म्हणता त्या गोष्टीवरून ते सिद्ध होत नाहीत इतकेच आम्ही म्हणतो व आम्हाला पटेल अशा इतर कोणच्याही रीतीने आत्म्याचे अस्तित्व तुम्ही सिद्ध केले नसल्यामुळे आम्ही तो मानावयास तयार नाही. तो नसेलच असे आम्ही म्हणत नाही. त्याचे अस्तित्व सिद्ध झाले नाही एवढेच आमचे म्हणणे आहे
 अलीकडच्या भौतिक शास्त्रज्ञांच्या मताने मन ही जडाहून काही निराळी वस्तु नाही. आगगाडीच्या इंजनापेक्षा रेडीओचे व्यापार सूक्ष्म असतात. रेडीओपेक्षा सजीव अशा झाडाच्या वाढीचे व्यापार सूक्ष्म असतात. त्यापेक्षा मानवाच्या देहाच्या वाढीचे व्यापार सूक्ष्म असतात. देहातल्या देहांतच हाता पेक्षा कानाचे व कानापेक्षा डोळ्याचे व्यापार सूक्ष्म असतात. याच रीतीने अत्यंत सूक्ष्म व्यापार असलेले मन हे एक यंत्र आहे. परमाणूंच्या संघटन- विघटनाचेच ते कार्य आहे. त्याचे व्यापार अत्यंत सूक्ष्म आहेत, इतकाच काय तो इतर जड गोष्टीत व त्याच्यात फरक आहे. गुलाबांच्या फुलातून सुगंधाचे जसे अत्यंत सूक्ष्म पण मधुर कण निघत असतात, कण्हेरीच्या फुलातून त्याचप्रमाणे सूक्ष्म पण उग्र कण जसे निघत असतात व हिरव्या चाफ्याच्या