पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८०)

यासंबंधी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. एक तर स्वतः जीनस् नेच म्हटले आहे की बाह्यतः दिसणारा निसर्गाचा हा लहरीपणा कदाचित् अधिक संशोधनाअंती खरा नाही असे ठरून कार्यकारणाच्या कैचीत वरील रेडियमचे रूपांतर बसविता येईलही. इतिहासात मागे असे अनेक वेळा झाले आहे. अगदी गती खुंटली असे वाटल्यानंतरही पुन्हा कार्यकारणभाव लागतो असे आढळले आहे व या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा संभव आहे. (पान १९) या म्हणण्याप्रमाणे थोडेसे होऊही लागले आहे. प्रकाशाची गती कोणत्याही अवस्थेत बदलत नाही असे धरून रिलेटिव्हिटीचा सिद्धांत सांगितलेला आहे. पण ते गृहीतकृत्यच चूक आहे. प्रकाशाच्या गतीत फरक पडतो असे आता आढळले आहे.
 पण याहीपेक्षा या प्रश्नाला निराळे उत्तर देता येण्याजोगे आहे. आपण असे समजू की शास्त्रज्ञाच्या अपेक्षेप्रमाणे रेडियममधील अणूंचे रूपांतर कार्य कारणाच्या कैचीत कधीच बसले नाही. जडसृष्टीतले व्यापारही कार्यकारणाला न जुमानता बेबंद होऊ लागले; तर्काला वेडेपणाचे वाटतील असे सिद्धांत गणितामुळे गृहीत धरावे लागले. पण असे झाले तरी धार्मिक लोकांना यात आनंद वाटण्याजोगे काय आहे ते कळत नाही. जीवनाच्या नियमांच्या कार्यकारणांचा जसा अजून उलगडा झाला नाही, मनाचे व्यापार शास्त्रांच्या कठोर नियमांना जसे अजून दाद देत नाहीत, त्याचप्रमाणे जड सृष्टीतली अंतिम तत्त्वेही कार्यकारणाला वश नाहीत, असे म्हणून शास्त्रज्ञांना दुर्दैवाने हात टेकावे लागतील व इतर सृष्टी प्रमाणेच जड सृष्टीही अनिर्बंध आहे म्हणून कोणचाच नियम कोणी कोणाला सांगू नये असे फार तर ठरेल. यापेक्षा निराळे काय ? जड सृष्टीच्या अभ्यासकांना पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही, यावरूनच दुसऱ्या कोणाला तरी ते ज्ञान होते, (म्हणजेच येथून पुढे श्रद्धेचे क्षेत्र लागले) असे म्हणणे म्हणजे वेडगळपणाचा कळस आहे. कुणालाच काही कळत नाही- अंतर्दृष्टीला कधीच कळत नव्हते, व प्रत्यक्ष प्रमाणांनी जडवस्तूंचे तरी स्वरूप पूर्णपणे कळेल असे वाटले होते तीही आशा नष्ट झाली. एवढाच खेदजनक सिद्धान्त फारतर यावरून निघेल. पण तुम्हाला येत नाही येवढ्याचसाठी ते आम्हाला येते असे माना, असे सांगणे याने मनोरंजन होण्यापलीकडे काहीच साधणार नाही.