पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७९)

अंतिम हेतु, जगाचे स्वरूप व मार्ग याबद्दल इतके मतभेद आहेत की त्यांच्या अलौकिक बुद्धीमुळे त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी असे वाटण्याऐवजी त्यांची बुद्धी अलौकिक होती. याच कारणासाठी ते ज्या विषयांत संचरत होते त्या विषयांत निश्चित असे काहीच नाही, तेव्हा आपण त्या नादी लागण्यात अर्थ नाही असेच कोणालाही वाटेल. भौतिक शास्त्रांत व अध्यात्मांत हाच तर मुख्य फरक आहे, पहिल्यामध्ये हजारो सिद्धांत असे आहेत की ज्याबद्दल एकही भौतिक शास्त्री शंका घेऊ शकत नाही व दुसऱ्यात असा एकही सिद्धांत नाही की ज्यावर सर्वांचे- एकाच धर्मातील सर्वांचे सुद्धा एकमत आहे. आणि म्हणूनच श्रद्धेचे क्षेत्र याला काही अर्थ नाही. मानवी बुद्धी खुंटली की त्या पलीकडे समजत नाही, म्हणून स्वस्थ बसण्याखेरीच दुसरा मार्ग नाही.
 सर जेम्स जीनस् याने आपल्या 'मिस्टीरियस युनिव्हर्स' या पुस्तकात एक चमत्कारिक प्रश्न उपस्थित केला आहे. पदार्थविज्ञानशास्त्रांत अलीकडे अशा काही गोष्टी आढळतात की, त्यामुळे आतापर्यंत भौतिक शास्त्रज्ञांनी मानलेला कार्यकारणाचा दुर्लघ्य नियम ढासळून पडत आहे, असे तो म्हणतो. (पान १७) रेडियम या धातूंतील अणूंचे हेलियम व शिसे या धातूत नित्य रूपांतर होत असते. पण दोन हजार अणू घेतले तर त्यांतील अमकाच अमुक वेळेला का रूपांतरित व्हावा, हे शास्त्राज्ञांना सांगतो येत नाही. कोणचेही कार्यकारणाचे नियम या ठिकाणी लागू पडत नाहीत. म्हणूनच याला रूदरफोर्ड व सॉडी यांनी Spontaneous disintegration असे म्हटले आहे. शिवाय आइन्स्टाइनच्या रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतामुळे विश्वाची पोकळी किंवा अवकाश (Space) हा मर्यादित आहे असे सिद्ध झाले आहे. अवकाश मर्यादित आहे म्हणजे काय याचा अर्थ कल्पनेनेसुद्धा जाणणे शक्य नाही. कारण पृथ्वीला सोडून एका रेषेत आपण कोट्यवधि नव्हे असंख्य मैल जरी लांब गेलो तरी तेथून पुढे पोकळी नाही म्हणजे काय हे समजणे शक्य नाही. यावर हे गणिती उत्तर देतातं की तर्कदृष्ट्या तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण विश्व आता तर्काच्या कक्षेत राहिले नाही. गणिताच्या नियमाने अवकाश हा सांत ठरला आहे, तेव्हा तो तसा धरलाच पाहिजे. (पान १२३)
 कार्यकारणभाव व तर्कशास्त्र प्रत्यक्ष भौतिक शास्त्रांनीच लाथाडल्यावर मग उरले काय असे वाटून विचारवंताचे मन अस्वस्थ होऊन जाते. पण