पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

साधनांची अपेक्षा असते त्यांत जसजशी सुधारणा होत जाईल, तसतसे प्रत्यक्ष ज्ञान जास्त चांगले होणार. अंतर्दृष्टीचे तसे नाही. वेदपूर्वकालापासून पृथ्वीच्या अंतापर्यंत तिची शक्ती कायम असावयास पाहिजे. तिच्यातही सुधारणा होते आहे, असे म्हणावयाचे असेल तर मागील ग्रंथांची सर्वज्ञता लटकी ठरेल. सर्वज्ञतेचा हेका भौतिकशास्त्रे कधीच धरीत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाणाच्या व मानवी बुद्धीच्या मर्यादा आधिभौतिक शास्त्रज्ञाच्या नेहमी ध्यानात असतात. शास्त्र ही धूर्त असतात व आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी जगात आहेत, अशी कबुली देणे त्यांना कमीपणाचे वाटते, असे रा. गो. म. जोशी लिहितात (पान ६६). स्वताला शास्त्रज्ञ म्हणविणाऱ्या या माणसाची ही वृत्ती खरोखर अत्यंत मनोरंजक आहे शास्त्रे जर नेमकी एकादी गोष्ट नसतील तर हीच. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा स्पष्टपणे ओळखून इतके कळते, इतके कळत नाही असे सांगण्याची प्रथा प्रथम याच शास्त्रांनी पाडली. ठायी ठायी अज्ञान आणि विसंगती दिसत असूनही सर्वज्ञतेची ऐट आणणे हे धर्मग्रंथांनाच साजते. शास्त्रांनी ते कधीही केलेले नाही.
 पण अमुक एक आपणास कळत नाही हे सांगण्याची शास्त्राची जी सत्य व नम्र वृत्ती आहे तिचा फायदा घेऊन काही लोक म्हणतात की मानवी बुद्धीला मर्यादा आहे. असे जर तुम्हीच कबूल करता, तर जेथपर्यंत ती बुद्धी जाईल तेथपर्यंत जाऊन तेथून पुढे श्रद्धेचे क्षेत्र आहे असे कबूल करावे. पण श्रद्धेचे क्षेत्र आहे असे कबूल करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? जडाच्या पलीकडे आपल्याला समजत नाही एवढ्याचसाठी ते दुसऱ्या कोणाला तरी समजते, असे मानावयाचे की काय ? आपले अज्ञान हाच दुसऱ्यांच्या ज्ञानाचा पुरावा कसा होतो ते कळत नाही ! श्रद्धा कोणावर व का ठेवावयाची ? श्रद्धेचे क्षेत्र मानणारे लोक तरी वाटेल त्यावर श्रद्धा ठेवतील काय ? आप्तवचनांवर श्रद्धा ठेवावी हे मान्य केले तरी आप्त कोण हा प्रश्न पुन्हा राहतोच. कपिल महामुनी, व्यास, श्रीकृष्ण, गौतमबुद्ध, शंकराचार्य, समर्थ, टिळक या महाविभूतींनी जे सांगितले त्यावर श्रद्धा ठेवावी, हे म्हणणे वाटेल त्या बुद्धिनिष्ठाला मान्य होण्याजोगे आहे. कारण या विभूतींचे चारित्र्य, त्यांचा त्याग, सागरासारखी त्यांची बुद्धी व महामेरूसारखे कर्तृत्व याबद्दल कोणालाही शंका नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या थोर पुरुषांच्या सांगण्यामध्ये