पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७७)

म्हणणे निराळे व ते ग्रंथ सर्वज्ञ आहेत व त्यांतील प्रत्येक वाक्य हे प्रमाण मानले पाहिजे हे म्हणणे निराळे. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, कर्म या अतींद्रिय सृष्टीतल्या विषयासंबंधी त्यांनी जी विधाने केली आहेत त्यात परस्परविरोध वाटेल तितका आहे. व विज्ञानाच्या कक्षेत येऊन ऐहिक विषयासंबंधी त्यांनी जे ज्ञान सांगितले आहे, त्यातले पुष्कळसे चूक आहे. जगदुत्पत्तीसंबंधी, व मानवाच्या उत्पत्तीसंबंधी यांनी जी माहिती दिली आहे ती चूक आहे, असे डार्विनने दाखविले आहे. यज्ञापासून पर्जन्य होतो हेही मनूचे विधान चूक आहे. कारण कांगो व्हॅलीत व ब्राझीलमध्ये यज्ञ नाहीतच; पण माणसेही फारशी नाहीत. सकरापासून निर्माण झालेल्या प्रजेचे विशेष गुण त्याने सांगितले आहेत तेहि आता रा. गो म जोशी यांखेरीज कोणी खरे मानीत नाहीत. सूर्याला स्वर्भानु म्हणजे राहू ग्रासतो व त्यामुळे ग्रहण लागते, हे ऋग्वेदांतले (५-४०-७ विधान चूक आहे, हेही सर्वांना माहीत आहेच. त्याचप्रमाणे घटामध्ये वीर्य पडल्याने पुत्रोत्पत्ती होऊ शकते, ही ऋग्वेदांतली कल्पनाही (७-३३ बरोबर नाही, याबद्दलही वाद नाही. जेथे जेथे पडताळा पहाता येतो, तेथे तेथे श्रुतिस्मृतीचे ज्ञान हे बहुतेक चूक ठरते. त्या जर सर्वज्ञ आहेत व ईश्वरप्रणीत आहेत, तर असे का व्हावे ? श्रुतिस्मृतीचे हे जे अज्ञान वर दाखविले आहे त्यातील हेतूबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये. या चुकांमुळे त्या ग्रथाचे वैभव रतिमात्रही कमी होत नाही असे माझे मत आहे. असल्या आणखी पांचशे चुका जरी आढळल्या तरी त्यातील अलौकिक काव्यप्रतिभा व बुद्धीची विशालता यांना अणूइतका सुद्धा दोष देता येणार नाही. ते ग्रंथ सर्वज्ञ आहेत, दिक्कालाच्या अतीत आहेत व म्हणून दिक्कालांनी मर्यादित भौतिक शास्त्राची त्यांच्यापुढे किंमत नाही, असे म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी व अंतर्दृष्टी हे ज्ञानसाधन कसे अविश्वसनीय आहे हे दाखविण्यासाठी ही खटपट केली आहे. वेद व स्मृति यांत चुका सापडतात म्हणून अंतर्दृष्टी अविश्वसनीय मानावयाची तर प्रिन्सिपियात चुका सांपडतात, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणे अविश्वसनीय का मानू नयेत, असा एक प्रश्न येथे विचारता येण्याजोगा आहे. पण त्याचे उत्तर वर आले आहे. प्रत्यक्ष प्रमाण हे पूर्ण निर्दोष व सर्वंकष आहे, असे कोणीच कधी म्हणन नाही. ते कमीत कमी निर्दोष आहे एवढेच म्हणणे आहे. शिवाय त्याला बाह्य