पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७६)

पण एवढयासाठी प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान मिळविणान्या भौतिकशास्त्राचे सिद्धांत टाकावे व अंतर्दृष्टीसारख्या सर्वस्वी अविश्वसनीय साधनाने ज्ञान मिळविण्यासाठी मोक्षधर्मशास्त्राचे सिद्धांत मान्य करावे, असे मुळीच ठरत नाही. (धर्मशास्त्रात अवलोकन, अनुभव, प्रयोग यावरून जे सिद्धात सांगितले असतील त्याबद्दल हे बोलणे नाही. पण डोळे मिटल्यानंतर जे दिसले त्याच्या आधाराने किंवा वेदांतील स्वल्पविराम व अवग्रह चिन्हे यांवर मारामारी करून त्यावरून जे सिद्धांत सांगितले जातात त्याबद्दल हे लिहिले आहे
 आधिभौतिक शास्त्रे ही मानवकृत व म्हणून दिक्कालांनी मर्यादित आहेत; धर्मग्रंथ हे साक्षात् परमेश्वराने मांगितले असल्यामुळे त्यांना दिक्कालाची मर्यादा नाही. तेव्हा धर्मशास्त्रापुढे दिक्कालांनी मर्यादित अशा भौतिक शास्त्राची मुळीच मातब्बरी नाही, असा एक मुद्दा नेहमी पुढे येत असतो. येथे पहिल्या प्रथम परमेश्वराच्या अस्तित्वाचाव प्रश्न उपस्थित होईल. पण तो न करताही असे विचारता येईल की अमुक एक ग्रंथ परमेश्वराने सांगितला हे कशावरून ठरवावयाचे ? वेद व उपनिषदे हीच परमेश्वराने सांगितली हे कशावरून ? पण लक्षात कोण घेतो? निबंधमाला, हे ग्रंथ किंवा टिळक, रामन्, बोस यांचे ग्रंथ यांना परमेश्वरवाणी का म्हणू नये ? मधुच्छंद, श्यावाश्व, सप्तवध्रि, श्रृष्टिगु या लोकांनी लिहिलेली सूत्रे ती परमेश्वराची, मग गीतगोविंद किंवा गीताज्जली ही का नव्हत? रामन्, बोस हे लोक आपल्या म्हणण्यास पुरावा देतात. नुसत्या आज्ञा करीत नाहीत; आणि जयदेव किंवा रवींद्रनाथ आम्ही हे काव्य पाहिले असे न म्हणता रचले असे म्हणतात एवढाच त्यांचा दोष ना ? पण पुरावा न देणे किंवा 'पाहिले' असे म्हणणे हे कोणीही करू शकेल. अंतर्दृष्टि हे साधन योग्य की अयोग्य हा वाद जरी क्षणभर मिटता घेतला, तरी अंतर्दृष्टीने पाहून लिहिलेला ग्रंथ कोणचा व तसा नाही कोणता, हे ठरविणे अशक्य आहे. असे असताना अमुक एक ग्रंथ परमेश्वरप्रणीत आहे, व त्यामुळेच त्यांतील धर्मशास्त्र सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे असे म्हणणारे लोक त्या ग्रंथावर नसत्या आपत्ती ओढवीत आहेत असे म्हटले पाहिजे. वेद, उपनिषदे, मनुस्मृति हे ग्रंथ मनोहर काव्य, प्रगल्भ तत्त्वज्ञान व आनुवंशाचा शोध यासाठी निरतिशय आदरणीय आहेत. महाभारत, रामायण यासारखे काव्य त्रिखंडांतही सापडणे शक्य नाही. पण हे