पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७५)

असे अनेक पंथ यात आहेत. नीतीच्या बाबतीत हेच आहे. अनेक स्मृती होऊन त्यांनी पूर्वीच्यांची मते रद्द केली. यापेक्षा अस्थिरतेचा पुरावा आणखी कोणचा पाहिजे ? आचारही असेच पालटत आले आहेत गाईचे मास खाणे हा एका काळी धर्म होता. आता तिला पशू म्हणणे हाही अधर्म आहे. आपले स्वरूप सर्व अंगाने असे नित्य पालटत असताना या धर्माने स्थिरतेची प्रौढी मिरवावी, यात काय अर्थ आहे ? नाही म्हणावयास आत्म्याचे अस्तित्व व तदनुषंगिक कर्मवाद ही आतापर्यंत कायम राहिली आहेत असे म्हणता येईल. पण येथे असा प्रश्न उत्पन्न होतो की, एखादे मत दोन हजार वर्षे लोकांनी उराशी धरून ठेवले, एवढयासाठीच ते खरे मानावयाचे की काय ? ईश्वर, आत्मा पुनर्जन्म, कर्मवाद हे मोक्षधर्मशास्त्राचे सिद्धांत पडताळून पहाण्याला साधनच नसल्यामुळे ते हजारो वर्षे टिकले या म्हणण्यात काही अर्थ नाही. जाखाई, जोखाई, मरीआई यांची पूजा वेदपूर्वकाळापासून आतापर्यंत म्हणजे हिंदूच्या अत्यंत श्रेष्ठ तत्त्वज्ञानापेक्षाही जास्त वेळ टिकून राहिली आहे. पण तेवढ्यावरून तिला कोणीच श्रेष्ठ समजत नाही तेव्हा भौतिकशास्त्रे अस्थिर आहेत व धर्मशास्त्र हे स्थिर आहे, या म्हणण्यात काही जीव नाही. बरे, भौतिक शास्त्रांचा सिद्धांत काल निघाला की आज अमलात आणावा, असे कोणीच म्हणत नाही. शास्त्रज्ञ सांगतील तो योग्य काल गेल्यानंतरच तो अमलात आणावा असेच कोणीही विचारी मनुष्य म्हणेल. योग्य काल म्हणजे पन्नास पाऊणशे वर्षे ठरविला तर त्यानंतरही म्हणजे दोनशे वर्षांनी किंवा चारशे वर्षांनीसुद्धा सिद्धांत बदलू शकतो हे खरे आहे व त्यामुळे मधली चारशे वर्षे ज्यांनी तो पाळला त्यांचे नुकसानही होईल. पण ही आपत्ती कोणत्याच मार्गाने टाळणे शक्य नाही, गीतेचा ज्ञानयोग निर्माण होईपर्यंत वेदवादरत होऊन काम्यकर्मे करीत राहणाऱ्या लोकांच्या आत्म्याचे नुकसान झालेच की नाही ? शंकरचार्यांचा संन्यासपर अर्थ ज्यांनी मान्य केला, त्या लोकांनी कर्मों सोडून दिल्यामुळे टिळकांचे गीतारहस्य निर्माण होईपर्यंत समाजाचे नुकसान होतच होते ना ? प्रतिलोमविवाह मान्य करणाऱ्याचे मनु येईपर्यंत व आनुलोम चालू ठेवणाऱ्यांचे याज्ञवल्क्य सांगेपर्यंत नुकसान झाले त्याची काय वाट ? हे जसे नुकसान माणसांनी सोसले तसेच भौतिकशास्त्र मान्य करून त्याअन्वये समाजरचना केली तर सोसावे लागेल, यापेक्षा जास्त काही नाही.