पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

मानीत नाही ? पण याचे उत्तर अवघड नाही. येथे न्यूटन किंवा शंकराचार्य असा प्रश्न नसून ज्ञान मिळविण्याची पद्धत कोणची असा प्रश्न आहे. अतर्दृष्टीने पाहिलेले सिद्धान्त खरे नसतात असे आढळल्यामुळे त्या दृष्टीचा उपयोग करून जो कोणी ज्ञान सांगू लागेल त्याच्यावर विश्वास बसत नाही. प्रत्यक्ष अनुभवाचा उपयोग करून कोणीही कोणचाही सिद्धान्त सांगितला तरी बुद्धिनिष्ठ मनुष्य तो मानण्यास तयार असतो. तेव्हा ज्ञानेद्रियांचा पुरावा केव्हा केव्हा सदोष असला तरी मानवाला उपलब्ध असलेल्या ज्ञानसाधनांमध्ये ते सर्वांत श्रेष्ठ साधन आहे, हे विसरून चालणार नाही. त्यापेक्षा निर्दोष साधन सापडेपर्यंत त्याचाच आश्रय केला पाहिजे व अचिंत्य भावांचे तर्काने आकलन करू नये असे सांगावयाचे असेल तर दुसऱ्या कशानेच ते आकलन होणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
 भौतिकशास्त्रांवर दुसरा असा आक्षेप येतो की त्यांचे सिद्धांत स्थिर नाहीत. दर दहावीस वर्षांनी काही तरी नवीन शोध लागतो व पूर्वीचा ढासळून पडतो. त्यामुळे अस्थिर, नित्य पालटणाऱ्या अशा भौतिक शास्त्रांच्या पायांवर समाजाचे नियम न रचता, सनातन शाश्वत अशा धर्मग्रंथांच्या आधारेच समाजशास्त्र रचले पाहिजे असे ते म्हणतात. या लोकांच्या मते भौतिकशास्त्रे अजून बाल्यावस्थेत आहेत व त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. पण यावर अशी शंका येते की, भौतिकशास्त्रे ही बाल्यावस्थेत आहेत व आस्थिर आहेत असे जरी क्षणभर मानले तरी धर्मशास्त्र हे प्रौढ व स्थिर आहे, या म्हणण्याला तरी काही अर्थ आहे काय ? सर्व जगाचे धर्म पाहिले तर तत्त्वज्ञान, नीति व आचार या विषयात त्या धर्माच्या जन्मापासून आतापर्यंत कायम राहिलेला एकही सिद्धांत सांगता येणार नाही. इतर धर्म सोडून दिले तरी सनातन म्हणविण्याच्या हिंदुधर्मात तरी वेदकाळापासून आतापर्यंत अगदी स्थिर राहिलेला असा कोणचा विचार आहे ? अगदी खेळीमेळीने वागणारे इंद्र-वरुणादी देव जाऊन तेथे निर्गुण, निराकार परब्रह्म आले. त्याच्या स्वरूपाबद्दल पुन्हा मतभेद सुरू झाला. आत्मा व ब्रह्म पूर्ण एक, थोडेसे भिन्न व पूर्ण भिन्न अशी निरनिराळी मते सुरू झाली. हे ब्रह्म प्राप्त करूत घेण्याच्या मार्गाबद्दल अशीच चंचल मनःस्थिती दिसते. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानयुक्त, भक्तिप्रधान, कर्मयोग