पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७३)

पण यावरून प्रत्यक्ष ज्ञान घेताना फार काळजी पूर्वक घेतले पाहिजे असे फारतर म्हणता येईल. कारण त्या प्रत्यक्षाच्या जागी जे अंतर्दृष्टीचे प्रमाण धार्मिक लोक आणू पाहतात व उपनिषदातील ऋषींनी आणि शंकराचार्यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी ज्या साधनाने ब्रह्माचे व जगाचे स्वरूप जाणले असे त्यांचे म्हणणे आहे. ते प्रमाण याहीपेक्षा फसवे आहे. डोळ्याच्या अंगचे सर्व दोष त्या अंतर्दृष्टीच्या ठायी असून शिवाय इतरही अनेक दोषांनी ती भरलेली आहे. डोळ्याला जसे निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळे दिसते तसे या दृष्टीला भास होत असतातच पण शिवाय मुख्य गोम अशी आहे की तिच्या साह्याने दोन माणसांना झालेले ज्ञान पुष्कळ वेळा सारखे नसते. शंकराचार्य, रामानुज, मध्व, कपिल, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, बुद्ध, जीझस् या सर्वांना अंतर्दृष्टीनेच ज्ञान झालेले असताना त्यांपैकी प्रत्येकाचे मत इतके भिन्न का असावे ? ब्रह्म व आत्मा एकरूप आहेत व ते भिन्न आहेत, ही ज्ञाने अंतर्दृष्टीनेच मिळालेली आहेत. देव अनेक आहेत व देव एकच आहे हे तिनेच सांगितले. आत्मा आहे व नाही हे ज्ञान तिजपासूनच झालेले आहे. याशिवाय धर्मशास्त्रांतला फारच मोठा दोष म्हणजे या आतल्या दृष्टीपासून झालेले ज्ञान पडताळून पाहण्यास मुळीच साधन नाही. ईश्वर, आत्मापरलोक हे पाहून कोणीही परत येत नाही. एकमेकांना एकमेकांचे अनुभव कधीही पटत नाहीत. डोळ्याने दिलेल्या ज्ञानात ही तरी सोय आहे. ते इतर इंद्रियांना तपासता येते व इतरांच्या अनुभवाशी तोलता येते. आणि हजारो जणांचे अनुभव जमले म्हणजे मगच ते खरे ज्ञान असे समजले जाते. पडताळून पाहाता येईल असे जे ज्ञान या दिव्य दृष्टीने प्रगट केले आहे ते बहुतेक सर्व चुकीचे ठरले आहे. त्याचे विवेचन पुढे येईलच. पण वरील विवेचनावरून पाहाता अंतर्दृष्टी हे ज्ञानसाधन अगदी अविश्वसनीय आहे हे ध्यानात येईल. बुद्धिनिष्ठ माणसाबद्दल आणखी काही गैरसमज उत्पन्न करून देण्याची अलीकडे पद्धत पडत चालली आहे. रा. गो. म. जोशी यानी त्यांच्या पुस्तकात यासंबंधी बरेच अर्थशून्य विवेचन केले आहे (पान ३९९) बुद्धिनिष्ठ मनुष्य अनुमान किंवा आप्तवाक्य मानीत नाही असे उगीचच काही लोक म्हणतात. व दुसरे काही म्हणतात की न्यूटन, डार्विन यांचा शब्द तुम्ही खरा मानता मग शंकराचार्य, वसिष्ठ यांचा का खरा