पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

एकही गोष्ट पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते फक्त आज्ञा करतात. ब्राह्मणांनी यज्ञ करावे. तेलतूप विकू नये, किंवा एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा यासारखे विधिनिषेध जसे कारणावाचून सांगितले जातात. तसेच जगाच्या आरंभी एकदम जल निर्माण झाले व त्यात एक सुवर्णाचे अंडे परमेश्वराच्या लीलेमुळे उत्पन्न झाले किंवा पृथ्वी चौकोनी असून तिच्याभोवतीच सर्व ग्रहगण फिरतात, हे सिद्धान्तही पुराव्यावाचून सांगितले जातात.
 आपण बोलावलेल्या सल्लागाराची लायकी- नालायकी ही अशी आहे. वस्तुस्थिती अशी आहे याबद्दल कोणाचाच वाद नाही. या इतिहाससिद्ध गोष्टी असल्यामुळे धर्मनिष्ठांनाही याबद्दल शंका घेता येत नाही. पण यावरून भौतिक शास्त्रेच व्यवहारात प्रमाण धरली पाहिजेत असा जर तुम्ही निष्कर्ष काढाल तर तो मात्र धर्मशास्त्राला संमत नाही. आहे हे स्थितीच धर्मशास्त्राच्या श्रेष्ठत्वाला कारण आहे व भौतिक शास्त्रांना मानवाच्या वर्तनाच्या बाबतीत अगदी हीन दर्जाचे स्थान आहे असे सांगणारे पुष्कळ विद्वान् लोक आहेत. म्हणून त्यांच्या म्हणण्याचा आपणास विचार केला पाहिजे
 धार्मिक लोक बुद्धिनिष्ठ लोकांवर नेहमी असा एक आक्षेप घेत असतात की, ज्या प्रत्यक्ष प्रमाणावर तुमचा सर्व भर आहे, ते प्रमाणच विश्वनीय नाही. एकादी गोष्ट खरी की खोटी हे तुम्ही डोळयाने पाहून ठरवता. पण डोळा आपणास नेहमी खरेच ज्ञान करून देईल हे कशावरून ? डोळ्याला अंधेरात एक दिसते, उजेडात दुसरेच दिसते. मन भ्याले असेल तर झाडाच्या ठायी भूत दिसेल. दोरीच्या ठायी सर्प दिसेल. फार उन्हातून चाललो तर पाणी नसेल तेथे पाणी दिसते. एका माणसाला एका ठिकाणाहून वस्तू एका प्रकारची वाटली तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्याच प्रकारची वाटते डोळयांना विकार झाले तर मग पहावयासच नको. तेव्हा डोळयांतल्या विकारामुळे अगर बाह्य परिस्थितीमुळे वस्तू मुळात जशी नाही तशी ती दिसू शकते किंवा पुष्कळ वेळा मन अन्य व्यवसायात गढून गेलेले असताना वस्तू पुढे असूनही दिसत नाही. हीच गोष्ट इतर ज्ञानेंद्रियांची. असे असतांना या ज्ञानेंद्रियांनी दिलेले ज्ञान विश्वसनीय कसे मानावे ?
 ज्ञानेंद्रियांची स्थिती वर सांगितल्याप्रमाणे आहे यात शंकाच नाही.