पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७१)

तील असे असतात. या शास्त्रांमध्ये हजारो सिद्धान्त असे आहेत की त्यांबद्दल जगातल्या एकाही पंडिताला संशय नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन यांच्या गतिस्थितीबद्दल व जडवस्तूंच्या मूलस्वरूपाबद्दल मतभेद आहेत. तसेच प्रत्येक शास्त्रातल्या काही नवीन सिद्धान्ताबद्दलही मतभेद आहेत. पण हे सर्व खरे असले तरी प्रत्येक शास्त्रात वादातीत असे पुष्कळच सिद्धान्त आहेत. याशिवाय या शास्त्रांत पुष्कळ प्रयोग असे आहेत की ते अगदी सामान्य सुशिक्षिताच्या बुद्धीलाही पटवून देता येतात. व्यक्तीच्या पापपुण्यावर ते समजणे न समजणे मुळीच अवलंबून नाही आणि यापेक्षाही विशेष म्हणजे या शास्त्राने आपल्या सत्यतेचे पुरावे म्हणून आगगाडी, तारामंत्र, विमान, रेडिओ, सिनेमा इत्यादी जे प्रकार समाजापुढे मांडले आहेत. त्याबद्दल जगातल्या दोनशे कोटी लोकांपैकी एकालाही शंका घेणे शक्य नाही.
 धर्मशास्त्राची स्थिती याच्या बरोबर उलट आहे. त्याचे ज्ञानाचे मुख्य साधन म्हणजे अंतर्दृष्टि होय. परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी सर्व गोष्टी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडच्या आहेत. डोळे मिटल्यावर त्या दिसू लागतात. कान मिटल्यावर ऐकू येतात. बुद्धि थांबल्यावर त्याचे ज्ञान होते असे त्यांचे म्हणणे आहे. डोळे व कान थांबल्यावर येणारे हे अनुभव प्रत्यक्षाइतकेच विश्वसनीय आहेत असे त्यास वाटते. पण हे अनुभव भौतिक शास्त्रांतल्याप्रमाणे हजारो जणांचे नसून एकट्या-दुकटया पुण्यपुरुषांचे असतात. यांत एकाला आलेला अनुभव दुसऱ्याला पटवून देता येत नाही. ज्याची त्यालाच फक्त खूण पटते. पण अंतरी पटलेल्या खुणांवरून उभारलेल्या धर्मशास्त्रात असा एकही सिद्धान्त नाही, की ज्यावर जगांतल्या सर्व धर्मनिष्ठांचे एकमत आहे. परमेश्वर हा कपिल व बुद्ध यांना मान्य नाही. आत्मा बुद्धाला मान्य नाही. हे दोन्ही ज्यांना मान्य आहेत, त्यांच्यामध्येही त्यांच्या स्वरूपाबद्दल अनंत मतभेद आहेत. जगताचे मिथ्यात्व तर फारच थोड्यांना मान्य आहे. अंतिम प्राप्तव्याबद्दल तर याहीपेक्षा जास्त वाद आहेत. नीती व आचार यांची अशीच स्थिती आहे. तेथे तर एकाच धर्माच्या पंडितांतही शेकडो मतभेद आहेत. शास्त्रीय संशोधनाची प्रत्यक्ष फळं म्हणून रेडिओ, विमान ही जशी जगापुढे मांडली जातात व ज्यांच्याबद्दल एकही मानव संशय घेऊ शकत नाही. अशी फळे धर्मशास्त्रात मुळीच नाहीत. धर्मशास्त्रज्ञ तुम्हाला