पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७०)

यापैकी कोणचा प्रकार स्वीकारावा, संततिनियमन करावे की नाही, समाजात कोणता धंदा कोणी करावा याला काही नियम असावे की काय, गाय हा उपयुक्त पशु समजावा, का तिच्या ठायी देवत्व पाहावे, सुशिक्षितांनी स्नानसंध्या सोडून दिली आहे तिचा जीर्णोद्धार करणे कितपत आवश्यक आहे, कुटुंबसंस्था टिकवावी की मोडावी, व्यभिचारात मागले लोक म्हणत होते तसे खरोखरीच काही भयंकर आहे काय; हे व या तऱ्हेचे प्रश्न सुशिक्षित मनाला केव्हा ना केव्हा तरी भंडावून सोडतात. भंडावून सोडण्याचे विशेष कारण असे की सर्व तऱ्हेची बंधने झुगारून देऊन युरोपीय तरुण तरुणी बेहोष उन्मादाने स्वैर-संचार करीत आहेत व जीवन हे आनंदाचे धाम करून सोडीत आहेत तरी, त्यांच्या पराक्रमांत तिळभरही उणेपणा येत नाही मग ही नीतिबंधने पाळून त्यांच्या तुलनेने अगदी सुतक्यासारखे वाटणारे जीवन आम्ही का कंठावे असे वाटू लागते व त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्राकडून मागवावी. का विज्ञान सांगेल त्याप्रमाणे वागावे, असा प्रश्न विचारी मनापुढे येऊन पडतो. याच प्रश्नाचा विचार प्रस्तुत निबंधांत करावयाचा आहे.
 धर्मशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांपैकी कोणाचा सल्ला आपण घ्यावा हे निश्चित करावयाचे असेल तर या दोघांची सल्ला देण्याच्या बाबतीतली लायकी नालायकी आपण प्रथम तपासून पाहिली पाहिजे; यांनी निर्माण केलेले ज्ञान कोणच्या पद्धतीने निर्माण केले आहे, ते कितपत विश्वासार्ह आहे, व जे अंतिम डोळ्यापुढे ठेवून ही शास्त्रे आपणांस उपदेश करणार ते अंतिमच आपणास मान्य आहे की नाही, याचा विचार झाला तरच वरील प्रश्न सोडविणे शक्य आहे. म्हणून या दोन सल्लागारांचे ज्ञान मिळविण्याचे मार्ग व त्यांची विश्वसनीयता आपण प्रथम तपासून पाहू.
 आधिभौतिक शास्त्रात प्रत्यक्ष अनुभव प्रयोग व अवलोकन यांवर सर्व भिस्त असते. या तीन साधनांनी जी माहिती जमा होते, तिच्यावरून यांतील सिद्धान्त सांगितलेले असतात. हे अनुभव किंवा प्रयोग एकट्यादुकट्याचे असून चालत नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो अभ्यासकांचे अनुभव एकत्र करावे लागतात. एकाला आलेला अनुभव दुसऱ्यांना पटवून द्यावा लागतो व त्याचे बाह्य परिणाम तर जगांतल्या कोणत्याही माणसाला दिस-