पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)

जगाला भोगावे लागले यात शंका नाही. विज्ञानाची वाढ होऊ लागली, तेव्हा धर्मग्रंथात त्या त्या विषयात जे सिद्धांत सांगितलेले होते, ते चुकीचे ठरू लागले. व धर्मग्रंथांतले शब्द हे परमेश्वराचे शब्द अशी धर्माधिकाऱ्यांची समजूत असल्यामुळे तो शब्द चुकीचा ठरणे म्हणजे आपल्या पायाखालची जमीनच जाण्यासारखे आहे, असे त्यांना वाटू लागले. व युरोपात त्या वेळी धर्मगुरूंच्या हाती कर्तुमकर्तुम् सत्ता असल्यामुळे नवीन ज्ञान सांगणाऱ्यांचा त्यांनी अनन्वित छळ सुरू केला. बायबलाहून भिन्न मत सांगितल्याबद्दल हॅपाशिया नावाच्या मुलीला दहाबारा धर्मगुरूंनी तुकडे तुकडे करून मारली. पृथ्वीप्रमाणेच आकाशात आणखी गोल आहेत, असे म्हटल्याबद्दल ब्रूनोला जिवंत जाळून मारले. पृथ्वी गोल असून सूर्य हा ग्रहमालेचा केंद्र आहे असे सांगितल्याबद्दल गॅलिलिओचा भयंकर छळ केला व इन्क्विझिशन् नावांची कोर्टे स्थापन करून बायबलविरोधी ज्ञान पसरविण्याच्या आरोपावरून १४८१ ते १८०८ या काळात सुमारे ३ लक्ष ४० हजार लोकांना ठार मारले. ज्ञानाचा नायनाट करण्यासाठी येशूच्या शांतताप्रिय धर्माने मानवांचा जेवढा भयंकर संहार केला तितका जगात कोणीही केला नसेल. पण या भयंकर छळाला न जुमानता एक पाय सतत अग्नीमध्ये ठेवून शास्त्रज्ञांनी आपले संशोधनाचे व ज्ञानप्रसाराचे काम अविछिन्न चालू ठेवले. व त्यांच्या त्या उग्र तपश्चर्येमुळेच युरोपमध्ये विज्ञानाची मधुर फळे आज चाखावयास मिळत आहेत.
 विज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळे पूर्वीच्या बरोबर उलट स्थिती आता येणार असा रंग दिसू लागला आहे. विज्ञानाच्या शाखा मागे धर्मग्रंथांनी व्यापल्या होत्या. तेथे आता विज्ञान हेच तत्त्वज्ञान, नीती व आचार या धर्मशास्त्राच्या शाखा व्यापू पहात आहे. जीवनशास्त्रातल्या उत्क्रांतिवादासारख्या सिद्धांतांनी नीतीच्या जुन्या कल्पना ढासळून पडल्या व नीती हे सामाजिक नियमांचे शास्त्र आहे, यात धर्माचा काही संबंध नाही. असे लोक म्हणू लागले. मानसशास्त्रातल्या संशोधनामुळे आत्म्याच्या स्वरूपाबद्दल व पुढेपुढे अस्तित्वाबद्दलही संशय निर्माण होऊन तत्त्वज्ञानाचाही प्रांत विज्ञानाने आपल्या कबजात घेतला. व आत्मा, देव वगैरे सर्व मिथ्या असून मानवाच्या देहाचे व मनाचेही सर्व व्यापार जडसृष्टीच्या नियमांनी बद्ध आहेत, असे सांगणारे शास्त्रज्ञ पुढे येऊ लागले व त्यामुळे सर्व समाजात मोठी खळबळ