पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)

हवी असते. पण तो प्रश्न अगदीच निराळा. कारण भांडवलवाले हे राष्ट्रहिताचा विचार कधीच करीत नसतात. अप्टन सिंक्लेअरचे 'ब्रास चेक' हे पुस्तक व लॉइड जार्जच्या आठवणी या वाचाव्या. म्हणजे या मुद्यावर जास्त प्रकाश पडेल.
 संततिनियमनाचा प्रश्न हा सामाजिक आहे, खाजगी नाही म्हणून व्यक्तीला या बाबतीत स्वतंत्रपणे काही ठरविण्याचा अधिकार नाही हे म्हणणेही खोटे. कारण समाजाला पुत्र देऊन त्याने जसे ऋण फेडावयाचे असते तसे स्वतः मोठ्या पदाला जाऊन व्यक्तीचे महत्त्व वाढवूनही फेडावयाचे असते. या दोहोमध्ये बांधा आल्यास ज्याचा त्याने निकाल करावा हे अगदी योग्य आहे. सर्व पृथ्वीतले धान्य मोजले तर प्रत्येकाच्या वाट्याला खूप येईल, तेव्हा संतति- नियमन करण्याची जरूर नाही हा उपदेशही त्या माणसाला करणे अयोग्य आहे. कारण या तात्त्विक विचारावर त्याची भूक भागत नाही, व त्याच्या अपत्याला कोणी दूध देत नाही. ती वाटणी कधीच सारखी होणे शक्य नाही. व दहापाच हजार वर्षांनी झाली तर तेव्हा तो उपदेश करण्यास काहीच हरकत नाही.
 दहा अपत्यांना जन्म देऊन त्यातली चार पाच जगणे या आपत्तीने स्त्रीला केवढे शारीरिक व मानसिक कष्ट सोसावे लागतात, व ते बंद झाल्यास तिच्या सुखात केवढी भर पडेल, याची ज्याला कल्पना येईल तो लोकसंख्येच्या वाढीवर नियमन घालावे असे एकट्या त्या विचाराच्या बळावरच म्हणावयास तयार होईल. मग भावी पिढी सुदृढ होणे, हवी तर लोकसंख्याही वाढविता येणे व राष्ट्रावर येणाऱ्या अनेक आपत्ती, बालहत्येसारख्या रानटी उपायाशिवाय टाळता येणे इत्यादी अनेक शक्यता यात दिसल्यावर तो लोकसंख्येच्या वाढीवर मानवाचे नियंत्रण असावयास पाहिजे या विचारास आनंदाने संमती देईल यात तिळमात्र शंका नाही.