पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६४)

करावे लागते राष्ट्राला किती खर्च सोसावा लागतो, व राहणीचे मान कसे उतरवावे लागते याची फारच थोड्यांना कल्पना असते व इतके करूनही दुसऱ्या राष्ट्रातल्या मुत्सद्यांनी दोन तीन कोटीचे एक राष्ट्र जरा आपल्या बाजूला वळवून घेतले तरी यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडणार. तेव्हा 'इतर गोष्टी सारख्या असल्या तर' युद्धामध्ये लोकसंख्या निर्णायक होईल हे खरे पण त्यासाठी आपली लोकसंख्या वाढविणे हा उपाय नाही. तर दोस्तीचे तह घडवून आणणे यावर सर्व मदार आहे. दोस्तीचे तह घडवून आणणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य तर नाहीच. कारण सत्तेचा समतोलपणा या तत्त्वामुळे प्रत्येक बाजूला मिळायला काही राष्ट्र उत्सुक असणारच. राष्ट्राराष्ट्रांतली भांडणे राष्ट्रसंघ मिटवू लागला तर लोकसंख्येच्या वाढीचा प्रश्नच नाही पण ती कल्पना मृगजळ म्हणून सोडून दिली तरीसुद्धा युद्ध प्रसंगासाठी, तोफेला बळी म्हणून प्रजा वाढवून ठेवण्याचा फारसा उपयोग नाही. निदान त्यासाठी जी किंमत द्यावी लागते तितका तर खासच नाही. कारण एक दोस्त इकडला तिकडे झाला तरी कोटी दोन कोटींचा फरक चटकन् पडतो. युद्धप्रसंगी एक चतुर मुत्सद्दी कोटी दोन कोटींचे काम सहज करू शकेल.
 अन्नाचा पुरवठा असेल, राहणीचे मान कमी करावे लागणार नसेल, तर लोकसंख्या वाढविण्यास कांहीच हरकत नाही पण तसे नसताना, लोकसंख्या वाढविण्याचा अट्टाहास हा केवळ राक्षसी प्रवृत्तीचाच द्योतक आहे. कारण त्यामुळे युद्ध हे अपरिहार्य होऊन बसते. ही काही मोठी आपत्ती आहे असे काही लोकांना वाटत नाही. उलट ते म्हणतात, संततिनियमन करून प्रजा कमी करण्याचा नामर्द उपाय अवलंबिण्यापेक्षा वाटेल तितकी प्रजा निर्माण करून, साम्राज्यमहत्वाकांक्षेने तिला भारून देऊन युद्धात तिला मरण्याला सवड देणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
 युद्धासंबंधी घरी बसून गप्पा मारणाऱ्या लोकांना हे बोलणे शोभेल किंवा भांडवलवाल्यांच्या हातातली बाहुली म्हणून राज्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे बोलणे शोभेल. पण ज्याने या बाबतीत कळकळीने विचार केला आहे त्याच्या असे ध्यानांत येईल, की प्रजेच्या नियमनाला युद्ध हा उपाय अत्यंत भयंकर आहे. संततिनियमनाने होणारी प्रजा सुदृढ होते. नैसर्गिक