पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६३)

अगदी फुकट आहे, तोफेला बळी निर्माण करण्यापलीकडे त्यांच्या मनात दुसरे काही नाही, असे वाटू लागते व त्याचाच म्हणजे लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा आता विचार करावयाचा आहे.
 लोकसंख्या हे राष्ट्राचे सामर्थ्य आहे व शेजारचे राष्ट्र जर लोकसंख्या वाढवील, किंवा ती आधीच वाढलेली असेल, तर प्रसंग आल्यावर रक्षण करण्यासाठी आपलीही लोकसंख्या वाढविली पाहिजे असे कोणाही जबाबदार माणसास वाटणे साहजिक आहे. पण हा विचार वरवर वाटतो तितका सोपा नाही. निवळ लोकसंख्येच्या जोरावर एकादे राष्ट्र पराक्रमी ठरेल असे कोणीही म्हणत नाही. इंग्लंड- हिंदुस्तान, जपान- चीन किंवा इंग्लंडमधलेच शे-दोनशे भांडवलवाले व लाखो मजूर ही उदाहरणं याबाबतीत अगदी निर्णायक आहेत व ती सर्वांना मान्यही आहेत. म्हणून लोकसंख्या हे सामर्थ्य आहे असे सांगताना Other things being equal म्हणून एक शब्दप्रयोग करीत असतात. त्याचा अर्थ असा की इंग्लंड व हिंदुस्थान या देशांमध्ये म्हणजे ज्यांच्यात राज्ययंत्र विज्ञान, शिस्त, एकरक्तता इत्यादी प्रत्येक बाबतीत जमीनअस्मान फरक आहे. तेथे लोकसंख्या हे सामर्थ्य विचारांत घेण्याजोगे नाही हे खरे; पण जेथे या इतर गोष्टी म्हणजे राज्यव्यवस्था, विज्ञान वगैरे गोष्टी दोन्ही देशांत सारख्या असतील तेथे मात्र लोकसंख्या हीच निर्णायक ठरेल. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स व जपान ही राष्ट्रे संस्कृतीच्या किंवा कर्तृत्वाच्या दृष्टीने अगदी सारखी आहेत. तेव्हा यांच्यामध्ये जर लढाई जुंपली तर तेथे मात्र लोकसंख्याच निर्णायक ठरेल असे कांही लोकांचे म्हणणे आहे.
 पण याही म्हणण्यांत फारसा जीव नाही असे ध्यानात येईल. जगात दोनच राष्ट्रे भांडत असली तर कदाचित् हे म्हणणे खरे धरता येईल. पण पुष्कळ राष्ट्रे किंवा चारपाच राष्ट्रे जरी जगात महत्त्वाकांक्षी व वर्धिष्णु असली तर दोनच राष्ट्रांमध्ये ती सहसा युद्ध होऊ देत नाहीत. आपण त्यांत पडतात. कारण त्यांना सत्ता समतोल ठेवावयाची असते. तेव्हा एखाद्या राष्ट्राची लोकसंख्या जरी दोन कोटींनी कमी असली तरी ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या बाजूला युद्धांत इतर राष्ट्रे कशी वळवून आणता येतील, याचा प्रयत्न करणे हे जास्त आवश्यक आहे. कारण एक तर कोटीने लोकसंख्या वाढविणे ही कांही गंमत नव्हे. त्यासाठी स्त्रीला किती दुःख सहन