पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

कमी होऊन दुसऱ्या बाजूने परागती होईल. या म्हणण्यातला मथितार्थ मान्य होण्याजोगा आहे. पण त्याचा उपयोग असा काहीच नाही. कारण ते प्रमाण कोणचे हे सांगणे शक्य नाही असे त्यानेच म्हटले आहे. आणि आपण स्वतः काही पाहू लागलो तर ६४९, ३४६, व ४५ इतकी भिन्न प्रमाणे असली तरी सायन्सच्या प्रगतीला बिलकूल अडथळा येत नाही असे स्पष्ट दिसते.
 राष्ट्रांमध्ये कर्त्यपिक्षा नाकर्त्याचे प्रमाण वाढू नये, याबद्दल कोणत्याही काळी व कितीही लोकसंख्या असली तरी लोकांनी दक्ष असले पाहिजे याबद्दल वाद नाही. पण ते आपापसांतले प्रमाण आहे. पण इग्लंडमध्ये ६४९ प्रमाण आहे म्हणून सायन्स, व्यापार या बाबतीत अणुमात्र प्रगती नसताना हिंदूस्थानाने लोकसंख्यावाढीची काळजी करावी हे अगदी असमंजस आहे असे वाटते.
 लोकसंख्येच्या वाढीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होतात. त्यांचा विचार आपण करूच. पण तो प्रश्न बाजूला ठेवला तर राष्ट्राची अंतर्गत सुधारणा, सायन्सची प्रगती, किंवा संस्कृतीची जोपासना यासाठी लोकसंख्येचे एक विशिष्ट प्रमाण आवश्यक आहे, असे मुळीच वाटत नाही. दर मैली ८६ या प्रमाणवर इंग्लंडने १६०० साली जग आक्रमणासाठी बाहेर पाऊल टाकले. व दर मैली ३४६ या प्रमाणावर १८६१ साली ते आक्रमण पुरे केले. तेवढ्या अवधीत शेक्सपीअर, बर्क, न्यूटन, डार्विन यांची संस्कृति निर्माण होण्यास अडचण पडली नाही; किंवा साम्राज्यवाढीस खळ पडला नाही. पराक्रमाबरोबर लोकसंख्या वाढत गेली हे खरे, पण एक तर ती आवश्यकच होती असे अमेरिकेकडे पाहिले तर म्हणावेसे वाटणार नाही. दुसरे असे की सायन्स, साम्राज्य व समृद्धी यांच्या वाढीबरोबर लोकसंख्या वाढली एवढे तरी निदान लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे ते काहीच नसतांना लोकसंख्या वाढविणे हे चूक आहे हे ध्यानांत येईल; तिसरे म्हणजे इंग्लंडवरून कांही अनुमान बसवावे असे वाटलेच तर मैली ३४६ प्रमाण आवश्यक आहे एवढेच फार तर म्हणता येईल. ६४९ प्रमाण झाले तरीही लोकसंख्येबद्दल ओरड कायम ठेवणे म्हणजे अशी ओरडण्याची लोकांना संवय लागली आहे इतकाच त्याचा अर्थ आहे, यापलीकडे काही नाही. हा विचार ध्यानांत घेतला म्हणजे ज्यांची लोकसंख्या आजच मैली ३४६ आहे त्या जर्मनी किंवा इटाली या देशांची ओरड