पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

हे पाहिले, तर या प्रश्नावर पुष्कळच प्रकाश पडेल.
 पुढे कोष्टक दिले आहे त्यातील आकडे लक्षांत घेतले तर लोकसंख्येसंबंधी जे अवास्तव गैरसमज पसरविण्यांत येत आहेत, ते जरा दूर होतील. हिंदुस्थानची लोकसंख्या फार आहे म्हणजे प्रमाण फार आहे असे सर्वांना वाटते. पण ज्या फ्रान्ससंबंधी आपण अगदी हाहाःकार ऐकतो, तेथले लोकसंख्येचे प्रमाण हिंदुस्थानपेक्षा थोडेसे जास्तच आहे. ज्या अमेरिकेच्या सामर्थ्याबद्दल आपणास संशयसुद्धा येत नाही, तेथले प्रमाण हिंदुस्थानच्या एक चतुर्थांशही नाही. इंग्लंडमध्ये दर चौ. मैली ६४९ लोक आहेत. आता प्रश्न असा येतो की जरी सध्या काही जोडप्यांचे संततीचे प्रमाण इष्ट प्रमाणापेक्षा अगदी कमी पडले तरी बिघडले काय ? शंभर वर्षापूर्वी हे प्रमाण २३९ होते तेव्हा इंग्लंडच्या वैभवात काय कमी होते ? त्यांच्या आधीच म्हणजे मैली १७५ प्रमाण असतानाच इंग्लंडने साम्राज्य उभारीत आणले होते. आणि मैली ३४६ लोकसंख्या झाली तेव्हा, -म्हणजे आज जर्मनी किंवा इटलीइतके प्रमाण होते तेव्हा- साम्राज्य पुरे झाले होते. बरे एकदा लोकसख्या कमी झाली म्हणजे पुन्हा वाढू शकणार नाही असे नाही. संपत्ती- समृद्धी आली व वाढावयास वाव असला तर पन्नास किंवा पंचवीस वर्षांत प्रजा दुप्पट होऊ शकते, हेच तर माल्थसने दाखविले असे असतांना संततीचे आज जे प्रमाण आहे, तेच प्रजा कितीही कमी झाली तरी तसेच राहील, लोक ऐकणार नाहीत अशी पोक्त भाषा काही लोक वापरताना ऐकले म्हणजे ही भावी पिढ्यांची फाजील, आपल्या अधिकाराबाहेरची काळजी आहे असे वाटते. लोकसत्ता, स्त्रीस्वातंत्र्य, साम्यवाद इ. अगदी दृढमूल व दुर्भेद्य विचारांना हिटलर, मुसोलिनी यांनी कलाटणी दिलेली आपण पाहतोच. तेव्हा ६४९ वरून लोकसंख्येचे प्रमाण ६४८ वर आले व आणखी खाली जाणार असे दिसू लागले की लगेच हाहा:कार करून टाकण्यात काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही.