पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५९)

 लोकसंख्येची वाढ व तिचे नियमन यांचा जीवनशास्त्रदृष्ट्या येथवर विचार झाला. आता हिटलरादि राजकारणी पुरुष या बाबतीत जे विचार प्रगट करीत आहेत व जे धोरण ठेवीत आहेत, त्याचा विचार करावयाचा आहे.
 आज युरोपांत लोकसंख्या वाढविण्याचा कित्येक राष्ट्रांतील लोकांना नुसता ध्यास लागल्यासारखा दिसतो. मुसोलिनीने सोळा वर्षांचे मुलगे व चौदा वर्षाच्या मुली आणून वीस हजार लग्ने लावून दिली. हिटलरने तीन लक्ष लग्नांचा संकल्प सोडला आहे. फ्रान्समध्ये अनेक पुत्र प्रसवणाऱ्या स्त्रीला बक्षीस आहे. या व यासारख्या बातम्या वाचून युरोपात काही भयंकर वंशक्षय झाला आहे की काय असे आपल्याला वाटू लागते. इंग्लंडात व अमेरिकेत संततिनियमनामुळे आणि उशीरा लग्नामुळे प्रजा जशी वाढावी तशी वाढत नाही अशी काही लोकांची तक्रार आहे. लोकसंख्या जगावयास हवी असल्यास प्रत्येक जोडप्यास निदान चार तरी मुले व्हावयास पाहिजेत. त्या ठिकाणी नव्या सुशिक्षित जोडप्यास सरासरी ३ होत नाहीत. तेव्हा लवकरच युरोपची लोकसंख्या नष्ट होईल अशी भीतीही काहींनी प्रगट केली आहे. हे सर्व वाचले म्हणजे मोठी मौज वाटू लागते. १८०० च्या सुमारास माल्थसला भीती वाटली की लोकसंख्या भूमिती श्रेढीने वाढणार आता कसे करावे ! त्याला सवाशे वर्षे झाली नाहीत, तो लोकसंख्या अजिबात नष्ट होणार की काय अशी भीती काही लोकांना वाटू लागली. माल्थसला दिसले वाढीचे प्रमाण तेवढयाच काळापुरते व तेवढयाच स्थळापुरते खरे होते, पुढे ते खरे ठरले नाही, व त्याची भीतीही निराधार ठरली, हे ध्यानात घेऊन या नव्या लोकांनी तरी उलट बाजूची अनुमाने काढताना थोडा धीर धरावयास हवा होता. एक दिवस एकाद्याने लंघन केले तर लगेच 'असे तू रोज करीत गेलास तर तू मरशील, सावध रहा' असे त्याला बजावण्यासारखेच हे आहे. वाढीचे प्रमाण जसे नेहमी टिकत नाही तसेच ऱ्हासाचेही टिकत नाही. वाढावयांस वाव मिळाला तर लोकसंख्या किती झपाट्याने वाढू शकते, हे ज्याने पाहिले आहे, त्याला ऱ्हासाची भीती बाळगण्याचे वास्तविक मुळीच कारण नाही. १८०० ते १९२० या कालांतली निरनिराळ्या देशांची लोकसंख्या कशी वाढली व आज प्रत्येक देशाच्या क्षेत्रफळाशी लोकसंख्येचे प्रमाण काय आहे