पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

हा गृहस्थ बोलू शकतो, हे पाहून माझ्या अंगावर अगदी शहारे आले. समाजांतल्या स्त्री-पुरुषांचे वात्सल्यच या पद्धतीने नष्ट होत असेल, तर सुप्रजाशास्त्राचे सगळे नियम पाळूनही तो समाज पृथ्वीतल'वरून लववकरच नाहीसा होईल यांत शंका नाही. मला तर आणखी असे वाटते की जरी तो नाहीसा होणार नसेल तरी त्या समाजांत जगण्यामध्ये सौंदर्य तरी काय ? प्रेम, दया, वात्सल्य या समाज जगवण्याच्याच केवळ शक्ती आहेत असे नव्हे. संसाराला त्यांनीच रम्यता येते. व जीवनशास्त्राच्या नादी लागून भावी पिढया सुदृढ करण्यासाठी आमचे जीवित जर असे वाळवंट करावयाचे असेल तर Eugenics and other evils हे नांव पुस्तकाला देण्यात चेस्टरटनने जी मनोवृत्ती दाखविली ती खास समर्थनीय आहे असे म्हणावे लागेल.
 पण सुदैवाने असे काही नाही. काही पिसाट लोक सोडून दिले तर या क्षेत्रांतले पंडित अत्यंत समंजस बुद्धीनेच याचा विचार करतात. व आपणास विचित्र वाटेल, आपल्या मृदु, नाजुक भावनांना धक्का बसेल असे सुप्रजाशास्त्रात ते काहीही सांगत नाहीत.
 प्रजा जास्त होणे व ती लवकर होणे याने आणखी एक तोटा होतो. याने समाज नेहमी अस्थिर अवस्थेत राहातो. पिढ्या लवकर पालटतात व नवीन जीव सारखे येत राहातात. त्यामुळे समाजाच्या शारीरिक व मानसिक रचनेत सारखी हालचाल सुरू राहते. स्थिरता येणे शक्यच होत नाही. व ही अवस्था समाजाला फार अनिष्ट आहे. थारेपालट व्हावी हे खरे; पण तिलाही काही मर्यादा आहेच. एकदा बसविलेले थर काही काल तरी स्थिर टिकले म्हणजेच त्यांचे कार्य ते करू शकतील. वारंवार घडी उसकटणे हे केव्हाही अनिष्टच ठरेल. A community which is reproducing itself rapidly must always be in an unstable state of disorganization highly unfavourable to the welfare of its members and especially of the new comers. A community which is reproducing itself slowly is in a stable and organized condition which permits it to undertake adequately, the guardianship of new members. (एसिल; टास्क ऑफ सोशल हायजीन्. पान १५१) या मताचा जाणत्या लोकांनी अवश्य विचार केला पाहिजे.