पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

कशी होईल, हा जो लगतचा उत्तरार्ध त्याचा अगदी थोडक्यांत विचार करू. अलीकडे वेडे, दुर्बल नाकर्ते, असल्या लोकांना निरपत्य करून टाकण्याचे अगदी सोपे वैद्यको उपाय निघाले आहेत. त्याचा अवलंब जर्मनी व अमेरिकेतील काही संस्थाने, येथे केला जात असून तो सफल होत आहे असे दिसून येते. त्याच प्रमाणे कर्त्या, बुद्धिमान तरुणावर सरकारने लक्ष ठेवून त्यांच्या मागची संसाराची काळजी नाहीशी करण्याची जर त्यांनी व्यवस्था केली, तर त्याच लोकांची प्रजा कमी होणे ही जी आपत्ती तीही नाहीशी होईल. गाल्टन वगैरे पंडित आज कित्येक वर्षे हा उपदेश करीत आहेत. पण साम्यवाद, लोकशाही यांच्या पुरस्कर्त्यांना तो पटत नाही. राजकीय अधिकार त्यांच्याच हाती असल्यामुळे पंडितांचा उपदेश अजून तरी वाया जात आहे असे कष्टाने म्हणावे लागते.
 नैसर्गिक निवडीच्या पुरस्कर्त्यांना आणखी एक मुद्दा सुचवावासा वाटतो. क्षयजंतु आपला मित्र आहे, बालमृत्यु पुष्कळ होणे चांगले, हे सांगतांना समाजाची सुदृढता वाढविण्याचेच मार्ग आपण सांगत आहो अशा भ्रमात राहून ते समाजाच्या दुसऱ्या एका फार मोठया शक्तीवर घाव घालीत आहेत, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. एका माणसाला दुसऱ्याबद्दल आपलेपणा वाटणे व दोघांनी एकमेकाला संकटांत मदत करणे, या आद्य भावनेवरच तर समाज उभारलेला आहे. क्षयरोग पसरू द्यावा, बालमृत्यु होऊ द्यावे, असे जर समाजाला पटले तर प्रेम, दया, स्नेह, सहानुभूती या समाजधारणेच्या ज्या आद्य शक्ती त्याच ओहटीस लागतील. हा विचारही अनेक पंडितांनी सांगितला आहे. पण सामान्य माणसालाही आपला आपण विचार करून तो समजण्याजोगा असल्यामुळे अवतरणे देऊनच तो पटवून द्यावा असे वाटत नाही. आपल्याला पुष्कळ मुलं होऊन त्यांतली पुष्कळ मरणे हेच समाजाला आवश्यक आहे, हे ज्या स्त्रीला पटेल तिचे वात्सल्य काय प्रकारचे होईल याची कल्पनाही करवत नाही. माझ्या माहितीचे एक समाजशास्त्री आहेत. आपल्या घराण्यात या पिढीला पुत्रसंख्या का कमी हे ते मला सांगत होते. ते म्हणाले, 'माझ्या धाकट्या भावाने लग्नच केले नाही, वडीलबंधू लवकरच वारले व माझ्या मुलांच्या बाबतीत 'डेथ रेट' जास्त झाला. आपल्या स्वतःच्या अपत्यांच्या बाबतीत सामाजिक अभ्यासकाच्या निर्विकार मानने