पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५४)

एक हजार कर्त्या पुरुषांच्या कुलांचा अभ्यास करून असे सांगितले की शरीर- दौर्बल्य हे या कर्त्या पुरुषांचे वैशिष्ट्यच दिसले. एलिसचा हा सिद्धान्त नियम म्हणून घ्यावा असे मी म्हणत नाही. पण विशिष्ट उदाहरणे म्हणून त्याकडे पाहिले तरी तो अगदी निर्णायक आहेत. कारण त्यान म्हटले आहे की या हजारांपैकी चाळीस लोक क्षयाने लहानपणीच मेले. सुमारे साठ लोक जन्मभर क्षयी होते. क्षय प्रबलांना काही करू शकत नाही हे खरे मानले तरी शरीराने प्रबल, एवढाच अर्थ करावा लागेल. मानाने प्रबल पण शरीराने दुर्बल अशा लोकांना क्षय मारू शकतो. आणि समाजाला यांची जरूर निःसंशय आहे. तेव्हा क्षयरोग मोकळा सोडावा की काय याचा समाजाने विचार करावा.
 दुसरे असे की काही लोक लहानपणी दुर्बल असतात. व मोठेपणी शरीरानेसुद्धा राक्षसासारखे होतात. बेंथम, बर्क, डिकन्स हे लोक असे होते. आणखी एकशे तीस लोकांची उदाहरणे एलिसने दिली आहेत. त्यांत न्यूटन आहे. ज्या रेड इंडियनांचा जीवनक्रम जोशांनी वाखाणला आहे; त्यांत हे बिचारे केव्हाच मरून गेले असते. दुर्बल ते मरतात या म्हणण्यात फसवेगिरी आहे. दुर्बल कोण हे आधी कोणी सांगत नाही. दुर्बल ते मेले असे म्हणावे, का मेले ते दुर्बल असे म्हणावे, याचे उत्तर या पंडितांना देता येणार नाही.
 निसर्गाप्रमाणे आपला जीवनक्रम ठरवावा असे पुष्कळ लोक सांगत असतात. पण या सांगण्याला काहीच अर्थ नाही. प्रश्न असा येईल की गाढवाप्रमाणे आपला जीवनक्रम ठरवावा का वाघाप्रमाणे ? क्षयजंतूप्रमाणे का दह्यातल्या जंतूप्रमाणे ? सर्वच निसर्गातले. उत्क्रान्तीमधली प्रणाली पाहून ठरवावे असे कोणी म्हणेल; पण हे सर्व त्या प्रणालीचा अर्थ बसवण्यावर अवलंबून आहे. असे दिसून येईल. अनंत जीव निर्माण करणे व फारच थोडे शिल्लक ठेवणे हे निसर्गात दिसते. म्हणून मानवानेही तसे करावे असे काही म्हणतात. उलट उत्क्रांतीकडे पाहिले तर वनस्पती, जंतु, जलचर, स्थलचर, या पायऱ्यावर उत्तरोत्तर प्रजा कमी करून तिच्या संगोपनाकडे जास्त लक्ष देणे हीच पद्धती दिसते असे दुसरे म्हणतात. अर्थात मानव ही शेवटची पायरी असल्यामुळे तेथे प्रजा कमी करून संगोपन शक्य तितके जास्त करणे हे ओघानेच आले. नैसर्गिक व कृत्रिम या शब्दांना बोलण्याच्या सोयीपुरता