पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५३)

 (२) आयडिया ऑफ प्रोग्रेस या निबंधात डीन इंगने सांगितले आहे की, Survival of the fittest does not mean that the most virtuous, or the most useful or the most beautiful survive. There is no moral of aesthetic judgement pronounced on the process of any part of it, जीवनार्थं कलहांत समर्थनम टिकून राहातात. याचा अर्थ असा नव्हे की, जे सुंदर, उपयुक्त, गुणशाली असेल तेच टिकेल. नीती किंवा रसिकता या दृष्टीने या (नैसर्गिक निवडीच्या) पद्धतीवर काही एक मत सांगता येणार नाही.
 नॅचरल सिलेक्शनचा अर्थ जर बरोबर ध्यानांत आला तर नैतिक मूल्य (Moral Value) मनात धरून आपण ज्या चांगल्या वाईटाच्या किंवा श्रेष्ठ- कनिष्ठाच्या कल्पना करतो तसल्या कल्पना येथे अगदी गैरलागू आहेत असे ध्यानात येईल. मानवप्रजा निसर्गाच्या हवाली केली म्हणजे नैसर्गिक निवडीला जर इतर सृष्टीप्रमाणेच मानव सृष्टींतही पूर्ण वाव दिला, तर शिवाजी, बाजी, टिळक, रानडे असली माणसेच फक्त टिकतील अशी जी आपली कल्पना आहे ती अगदी चुकीची आहे. जोशांना हे म्हणणे अगदी पूर्णपणे मान्य आहे. 'अनेकविध पिंड निर्माण करून त्यांतले प्रबल तेवढे शिल्लक ठेवणे अशी सृष्टीची प्रक्रिया दिसते. येथे प्रबल या शब्दाने जीवनक्षम एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. मग तो कोणत्याही कारणाने जगलेला असो' असे त्यानीच म्हटले आहे. (पान १२८). पण नॅचरल सिलेक्शनचा हा खरा अर्थ त्यांना मान्य असण्याचा काही एक उपयोग नाही. कारण याच्याबरोबर उलट व चुकीचा अर्थ तोही त्यांना मान्य आहे. निसर्गाच्या निवडीत जे टिकतील ते काटक, बलवान, शूर, उद्योगी, साहसप्रिय असेच असतील असे त्यांनी म्हटल्याचे वर सांगितलेच आहे.
 नैसर्गिक निवड या तत्त्वाचा खरा अर्थ ध्यानांत आला म्हणजे हेक्रॅफ्ट, स्नो, जोशी, वगैरे पंडितांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा कसा चुकीचा आहे हे ध्यानांत येईल. हेक्रॅफ्ट म्हणतो क्षयजंतु, महारोगजंतु दुर्बलांनाच तेवढे मारतो, प्रबलांना तो काही करू शकत नाही पण या म्हणण्याला काडीचाही अर्थ नाही. दुर्बल म्हणजे कोण ? शरीराने दुर्बल तो, का मनाने दुर्बल तो ? कित्येक बुद्धिमान व कर्ते पुरूष हे शरीराने अगदी दुर्बल असतात. हॅवलॉक एलिसने