पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५२)

लच्या परिस्थितीच्या दृष्टीने ज्यांची शरीर व मनोरचना टिकण्यास योग्य ते टिकणे व बाकीचे मरणे व अशी प्रक्रिया हजारो वर्षे चालून, लांडग्याचा कोल्हा किंवा एका माशांचेच निरनिराळे प्रकार हे निर्माण होतात. सृष्टीतल्या या प्रक्रियेलाच डार्विनने नॅचरल सिलेक्शन किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असे नांव दिले आहे.
 येथे अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती ही की सिलेक्शन किंवा फिटेस्ट या शब्दांनी आपल्या मनांत जो श्रेष्ठ, समर्थ, वरच्या दर्जाचा असा अर्थ येतो तसा डार्विनच्या मनात पुसटसुद्धा नाही. त्या परिस्थितीत जगण्यास योग्य इतकाच अर्थ आहे. सशासारखा एक बारीक प्राणी आहे. त्या जातीत काही गवताच्या रंगाचे असतात; कांही काळे व काही पाढरे असेही असतात. भोवती गवत वाढले की घार गिधाड वगैरे प्राण्यांना गवतांच्या रंगाचे प्राणी निवडून दिसत नाहीत. काळे व पांढरे प्राणी मात्र भिन्न रंगामुळे त्यांच्या नजरेत भरून त्यांना ते खाऊन टाकतात. येथे नैसर्गिक निवडीने जे शिल्लक राहिले त्याच्यांत श्रेष्ठपणा कोणचाच नव्हता. त्या परिस्थितीत ते 'फिटेस्ट' इतकेच. हिरवे व पांढरे किडे झाडावर असले तर बर्फ पडल्याबरोबर हिरवे किडे पक्ष्यांना दिसू लागतात व त्यांचा फन्ना उडतो. उलट बर्फ जाऊन पालवी फुटली की पांढरे मरतात. हे नॅचरल सिलेक्शन आहे. यावरून निसर्ग ज्यांना निवडील ते साहसी, शूर, उद्योगी, काटक असे असतील हे म्हणणे अगदी भ्रामक आहे हे ध्यानांत येईल. म्हणजे निसर्गशक्ती ही आंधळी आहे. तिच्या मारामारीत समाजदृष्टीने आपण ज्यांना चांगले म्हणू तेच टिकतील असे नाही. त्यांच्या योग्य परिस्थिती आली तर तेही टिकतील. पण तेच टिकतील असे नाही. अत्यंत दुर्बल, अत्यंत घाणेरडे, असेही टिकतात. जीवनशास्त्रांतील अनेक तज्ज्ञांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. (१) सायन्स ऑफ लाइफ मध्ये ज्यूलियन हक्सले म्हणतो- Evolution has achieved much that is definitely bad. It has brought into being, not only strong, beautiful and intelligent creatures, but also degenerate parasites and loathsome diseases. (उत्क्रांतीमध्मे प्रबल, सुंदर, व बुद्धिमान प्राणीच वर आले असे नसून अत्यंत किळसवाणे रोगजंतू व अधम परपुष्ट प्राणीही टिकले आहेत- पान ३८७).