पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५१)

आहे, हे वरील विवेचनावरू ध्यानांत येईल. क्षय, महारोग, दारू हे समाजांचे मित्र आहेत. बालमृत्यु पुष्कळ असणे चांगले आणि लोकांना दुधासारखे सकस अन्न पुरवून किंवा अनाथ विद्यार्थीगृहासारख्या संस्था चालवून जीवांचे कृत्रिम रीतीने रक्षण करणे हे समाजाला घातुक आहे. कारण त्यामुळे निसर्गाच्या निवडीला वाव मिळत नाही, अशा मताचा हा पक्ष आहे.
 मला वाटते नैसर्गिक निवड या तत्त्वाचा अर्थ नीट न समजल्यामुळे वरच्यासारखी विपर्यस्त विधाने लोक करू शकतात. हे तत्त्व प्रथम डार्विनने सांगितले. एका जीवकोटीपासूनच अनेक जीवकोटी झाल्या, मत्स्यकच्छादि जीवकोटीमध्ये फरक पडत जाऊनच आजचा मानव झाला; मानवाच्या मागली अवस्था माकड ही होती, इ. त्याच्या प्रसिद्ध उत्क्रान्तिवादांत येणाऱ्या गोष्टी आता सर्वांच्या परिचयाच्या आहेत. एका जीवकोटीपासून दुसरी जीवकोटी तयार होणे याचेच नांव उत्क्रान्ति ही जी उत्क्रान्ति निसर्गात घडून येते, ती घडतांना नैसर्गिक निवड या तत्त्वाची अंमलबजावणी होत असते. एक उदाहरण घेऊन याचा अर्थ स्पष्ट करू. लांडग्याच्या वर्गात कुत्रा हा प्राणी आहे. लांडग्याचा कुत्रा होणे ही उत्क्रान्ति आहे. चमत्कार कसा होतो ते आता पाहू.
 आपणास हे ठाऊक आहे की एकाच आईबापांच्या संततीत पुष्कळ फरक असतो. दोन सख्खे भाऊ एकमेकांपासून अगदी भिन्न गुणांचे असतात. माधवराव व नारायणराव पेशवे हे उदाहरण प्रसिद्ध आहे. लांडग्यामध्येही असेच होणार. कांही अगदी भयंकर क्रूर, कांही जरा गरीब, असा फरक पडणारच. आता हे लांडगे मनुष्याच्या नजीक आल्यावर मनुष्य अर्थातच क्रूर लांडग्यांना मारून टाकणार. त्यामुळे गरीब तेवढे शिल्लक राहाणार व त्यांचीच पुढली पिढी होणार. त्या पिढीत पुन्हा क्रूर, गरीब असा फरक होणारच. अर्थात क्रूरांचे प्रमाण यांत कमी होईल हे उघडच आहे. या पिढीतलेही क्रूर लांडगे मनुष्य मारून टाकीत. असे होत होत काही शतकांनी त्या प्रांतात गरीब लांडगेच फक्त राहतील. मनोरचनेत ज्याप्रमाणे फरक पडत जातात, त्याचप्रमाणे शरीररचनेतही पडतात. व ज्याची शरीररचना भोवतालच्या परिस्थितीत टिकण्यास जास्त अनुकूल ते टिकतात व बाकीचे मरतात. मनोवृत्ती व शरीर रचना यांमध्ये अकारण फरक पडत जाऊन, भोवता-