पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

म्हणतात, (पान ३३३). आहे ती लोकसंख्या टिकविण्यास प्रत्येक जोडप्यास दोन तरी मुले झाली पाहिजेत. त्यांना तेवढीच मुले झाली तर ती दुर्बल व हीन प्रतीची असली तरी दोन्ही जगविणे त्यांना प्राप्तच आहे. त्यांत निसर्गाला निवड करल्यास वाव नाही. त्यांना जर पाच सहा मुले झाली तर त्यांतली दुर्बल, नालायक तेवढी निसर्ग मारून टाकून सबल तेवढी ठेवील व त्यामुळे समाजांत कर्त्या पुरुषांचे प्रमाण वाढेल. अशी ही विचारसरणी आहे. तेव्हा प्रत्येकाने शक्य तेवढी प्रजा निर्मून निसर्गाच्या निवडीला वाव देणे हे त्यांचे कर्तव्य आहे हे ओघानेच आले. जीवांचे कृत्रिम तऱ्हेने रक्षण करणे जोशांना मान्य नाही. अनाथ विद्यार्थीगृहासारख्या संस्थांना त्यांचा विरोध आहे. शाळेतल्या सर्व विद्यार्थीना दूध मिळण्याची व्यवस्था करून काही एक उपयोग नाही असं त्यांना वाटते. नैसर्गिक निवडीचा पूर्ण अंमल होऊ दिल्यास 'अशा समाजांतील स्त्रीपुरुष काटक, बलवान्, शूर, उद्योगी, साहसप्रिय असेच निर्माण होतील' असे ते म्हणतात (पान १२०).
 जोशांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. ते अमुक म्हणतात असे बोलण्याची सोयच त्यांनी ठेवली नाही. गीतेप्रमाणेच आपल्याही ग्रंथांतून वाटेल ती मते निघावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते. तुम्ही नैसर्गिक निवडीवर सर्व भर देता असे कोणी म्हटल्यास, रॅशनल म्हणजे मानवकृत निवडही मला मान्य आहे, असे म्हणून त्यालाही ते आधार काढून देतील. तरी पण अनाथ विद्यार्थीगृहाच्या व एकंदर कृत्रिम तऱ्हेने पिण्ड जगवण्याच्या आपण का विरुद्ध आहो, हे ते मुळीच सांगणार नाहीत. दोन चार मुले झाल्यावर मग संततिनियमन करू असे कोणी म्हणतील, तर संततीपैकी पहिल्या दोन तीन मुलात वेड लागणे, गुन्हेगारी, क्षयरोग, मनोवैक्लव्य ही जास्त प्रमाणात असतात असे हे सांगतील. (पान ३३१) पण पुढे बालविवाहाचे फायदे सांगताना चटकन् मोहरा फिरवून असेही सांगतील. की, 'कोणाही मनुष्याची जी काही संतती शिल्लक राहते, त्यामध्ये आधी झालेल्यांची जीवनशक्ती पुढे झालेल्या मुलांच्या जीवनशक्तीपेक्षा जास्त असते. आणि आधी झालेल्या संततीची संततीही पुढे झालेल्या संततीच्या संततीपेक्षा जास्त सुदृढ असते.' (पान ३६५)
 असो. तर नैसर्गिक निवड व्हावी, अशा मताच्या लोकांचे म्हणणे काय