पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)

नवी साधने घेण्याला मन अनुकूल होणे, पैसे देऊन ती घेणे व वापरणे हे समाजातल्या शिकलेल्या लोकांनाच तेवढे आरंभी शक्य होते. अडाण्यांना ते पटतही नसे व त्यांना ते शक्यही नव्हते. पण यामुळे समाजावर एक भलतीच आपत्ती आली. शिकणाऱ्या, महत्त्वाकांक्षी व संस्कृत लोकांचीच प्रजा तेवढी कमी होऊ लागली. अडाणी, मंद लोकांची प्रजा पूर्वीच्याच भरमसाट गतीने वाढत होती. त्यामुळे समाजांत नाकर्त्या लोकांचे प्रमाण वाढून तो अधोगतीला चालल्याची स्पष्ट लक्षणे दिसू लागली. तेव्हा संततीच्या बाबतीत मानवाने हात घालणे चूक आहे, असे काही लोक म्हणू लागले. रोगराई, दुष्काळ ही निसर्गाची नियमने योग्य आहेत. रोग हटवणे, पीडितांना मदत करणे इत्यादी जे उपाय मानव करीत आला आहे, त्याने समाजाची हानी होत आहे, असे या पक्षाचे मत आहे.
 आज या विषयावर अनेक विचार आपणास ऐकावयास सापडतात. माल्थसने दाखविलेले वाढीचे प्रमाण तेथल्या विशिष्ट परिस्थितीत व त्या काळातच फक्त होते. ते नेहमींचे नाही तेव्हा त्याला भिण्याचे कारण नाही, असे काही म्हणाले. काही शास्त्रज्ञ म्हणाले की, जमिनीतून अन्न किती निघेल याला सांगितलेल्या मागल्या मर्यादा शास्त्राच्या साह्याने खूपच वाढविता येतील. कोणी अर्थशास्त्री म्हणतात की, आज अन्न कमी असे वाटते ते खरे नाही. अन्न वाटेल तितके आहे. त्याची वाटणी योग्य होत नाही, म्हणून हे सर्व दुःख आहे. संततिनियमन एकदा मान्य केले तर लोक त्यापासून कधीच परावृत्त होणार नाहीत व मग तो देशच अजिबात नाहीसा होईल अशीही भीती काहीनी व्यक्त केली. आपण संख्या कमी केली तरी आपल्या शेजारचे राष्ट्र तसे करणार नाही व मग लढाईच्या वेळी आपला पराजय होईल, असे राजकीय प्रश्नही यांत उपस्थित झाले. लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक असल तरी ते मानवाने घालणे हे हानिकारक असून तो प्रश्न निसर्गावर सोपविणे योग्य आहे असेही एक मत असल्याचे वर सांगितलेच आहे. धर्मदृष्ट्या हे पापकृत्य आहे असे धार्मिक लोकांनी सांगितले. आपली प्रजा पोसण्याचे सामर्थ्य नसणे म्हणजे नामर्दपणा आहे, असा धि:कारही कोणी केला. अशा तऱ्हेने धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, राजकारण इत्यादी अनेक शास्त्रांतून या नियमनासंबंधी अनुकूल-प्रतिकूल चर्चा सुरू झाली. त्यांपैकी जीवनशास्त्र व