पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

पण सालमन मासा होऊन युगानुयुगे जगणे नको असेच तो सांगतो. (पान २०) प्रत्येक वर्गाला त्याचे एक विशिष्ट गुरुत्व असते व त्यातच तो जगू शकतो असे त्याने म्हटले आहे खरे पण मला त्याचा नेमका बोध झाला नाही. त्यानेही ते कोठे स्पष्ट केले नाही. जोशांनी अर्थातच धंदा बदलणे म्हणजे विशिष्ट गुरुत्व घालविणे असा अर्थ केला आहे तसेच एकदा खालच्या वर्गातला मनुष्य वरच्या वर्गात चढतो तेथे तो लग्न करतो. त्याची भरभराटही होते, पण दोन तीन पिढ्यांतच त्याचे घराणे नाश पावते असेही त्याच पानावर टीपेत त्याने म्हटले आहे. पण असे कधी कधी घडते असे त्याने सांगितले आहे. म्हणून त्याचा विचार करण्याचे कारण नाही. जोशांनी मात्र Occassionally it happens याचे 'कित्येक वेळा असे घडते की' असे खोटे भाषांतर करून तो आधार जुळतासा करून घेतला आहे.
 इतिहासकार सरदेसाई यानी 'मराठेशाहीत एकंदरीत पाहता ब्राह्मणांचा नाश फार झाला' असे म्हटले आहे. पण तेथेही ब्रह्मणांची कामे ज्यांनी सोडली त्यांचा झाला. व मनुस्मृतीत जी ब्राह्मणांची कामे म्हणून सांगितली आहेत ती ज्यांनी सोडली नाही त्यांचा झाला नाही असे काही एक सांगितलेले नाही. अर्थात वर्गांतराशी त्याचा काही एक संबंध नाही. पण जोशी हाही आधार आपल्या बाजूला घेत असतात.
 सायंटिफिक औक लुक म्हणून बट्रांड रसेलचे एक पुस्तक आहे. त्यांत एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते साधण्याच्या धोरणाने ज्याची रचना केली असेल, तो शास्त्रशद्ध समाज' (सायंटिफिक सोसायटी) अशी त्याने व्याख्या केली आहे; त्या समाजाचे वर्णन त्याने एकंदर सहा प्रकरणांत केले आहे. त्यांत जाती असाव्या, प्रत्येकाला आपल्या खुषीप्रमाणे धंदा करता येणार नाही, उच्च वर्गाने ज्ञान गुप्त ठेवावे, खालच्या वर्गाला बोलण्याचा हक्क नसावा, अशी जोशांनी उद्धृत केलेली वाक्ये आहेत. पण त्याच्या पुढच्याच प्रकरणांत त्याने सांगितले आहे की, सायन्स सायन्स करून हृदय व भावना यांना विसरून जाणाऱ्या लोकांच्या समाजांचे कसे विकृत स्वरूप होईल ते मी मागल्या प्रकरणांत दाखविले आहे. ते कोणीही परमार्थाने मानू नये. समाजाची ती काळी बाजू आहे. पण पुढची ही सूचना गाळून टाकून जोशांनी मधलीच